Donald Trump on Dividend by Tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर आयात शुल्क (टॅरिफ) लागू केलं आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफबाबतच्या निर्णयामुळे जग व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावर आलं आहे. अमेरिकेने अनेक देशांवर आयात शुल्क लागू केल्यामुळे अमेरिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसुलाची भर पडणार असली तरी या निर्णयामुळे अमेरिकेला मोठा फटका देखील बसणार आहे. यामुळे अनेक अमेरिकन नागरिक हे ट्रम्प यांच्यावर नाराज आहेत. अशातच ट्रम्प यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

ट्रम्प यांनी म्हटलं आहे की “टॅरिफद्वारे मिळणाऱ्या महसुलाचं वितरण शक्य आहे. काही अमेरिकन नागरिकांना परस्पर आयात शुल्काद्वारे (reciprocal tariff) जमलेल्या महसुलातून एक प्रकारचा डिव्हिडंड (लाभांश) मिळू शकतो.” रॉयटर्सने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेतील लोकांना, प्रामुख्याने मध्यमवर्गीय व गरिब नागरिकांना आम्ही हा डिव्हिडंड देऊ शकतो.” न्यू जर्सी येथील गोल्फ क्लबवरून निघताना ट्रम्प एअर फोर्स वन या विमानात चढत होते. त्याचवेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठलं आणि टॅरिफबाबतचे प्रश्न विचारले. त्यावर ट्रम्प यांनी सदर वक्तव्य केलं.

व्यापारी तूट भरून काढण्यासाठी ट्रम्प यांचं ‘टॅरिफ’ अस्त्र

डोनाल्ट ट्रम्प यांनी अमेरिका व व्यापार भागीदार देशांमधील व्यापारी तूट (trade deficit) भरून काढण्यासाठी जवळपास सर्वच देशांवर टॅरिफ लागू केलं आहे. एप्रिलमध्ये त्यांनी परस्पर आयात शुल्क लागू केलं. ज्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली, तसेच अनेक देशांचे शेअर बाजार गडगडले. अनेक देशांचे शेअर बाजारत पूर्ववत झालेले नाहीत.

आयात शुल्कावरून विविध देशांबरोबर अमेरिकेच्या वाटाघाटी

परस्पर आयात शुल्काची घोषणा केल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचा निर्णय ९० दिवसांसाठी स्थगित केला. तोवर प्रत्येक देशासाठी १० टक्के टॅरिफची प्राथमिक मर्यादा त्यांनी निश्चित केली आणि सर्व देशांना अमेरिकन प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी वेळ दिला. या देशांनी अमेरिकन प्रशासनाशी चर्चा करावी, आर्थिक करार करावेत, त्यातून आयात शुल्क ठरवलं जाईल असं ट्रम्प प्रशासनाने जाहीर केलं होतं. ही मुदत ९ जुलै रोजी संपणार होती. मात्र, अनेक देशांबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याने ही मुदत १ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आणि आता ७ ऑगस्टपासून आयात शुल्क लागू केले जातील अशी घोषणा करण्यात आली आहे.