Donald Trump Criticised Brazil Over Policies : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (५ सप्टेंबर) ब्राझील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ब्राझीलमधील डाव्या सरकारची धोरणं अत्यंत चुकीची आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ब्राझील सरकारच्या धोरणांवर टीका करत ट्रम्प म्हणाले, “तिथल्या डाव्या विचारसरणीच्या सरकारने आणलेल्या धोरणांमुळे त्यांच्या देशाचं नुकसान होत आहे. माझ्या मनात त्यांच्या जनतेबद्दल खूप सहानुभूती आहे.”

वॉशिंग्टनमध्ये एका पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आम्ही ब्राझील सरकारवर खूप नाराज आहोत. तिथलं सरकार अशा काही गोष्टी करतंय जे खूप दुर्दैवी आहे. ब्राझीलच्या जनतेशी आमचे चांगले संबंध आहेत. परंतु, तिथलं सरकार डाव्या विचारसरणीचं आहे आणि ते सरकार ब्राझीलचं, तिथल्या जनतेचं खूप नुकसान करतंय.”

ट्रम्प प्रशासनाचा ब्राझीलवर रोष?

एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे की न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात अनेक परदेशी प्रतिनिधीमंडळांच्या हालचालीवर बंदी घालण्याचा अमेरीकन प्रशासनाचा विचार आहे. अशातच ट्रम्प यांनी ब्राझीलवर संताप व्यक्त केल्याने या अधिवेशनातील ब्राझीलच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या अमेरिकेतील उच्चस्तरीय बैठकीत पॅलेस्टिनी नेते महमूद अब्बास सहभागी होऊ शकणार नाहीत. कारण अमेरिकेने त्यांचा व पॅलेस्टिनी शिष्टमंडळाचा व्हिसा नाकारला आहे. इराण, सुदान, झम्बाब्वे आणि ब्राझीलबाबतही अशाच प्रकारचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २२ सप्टेंबरपासून हे अधिवेशून चालू होणार आहे.

ब्राझील व अमेरिकेतील तणाव वाढला

आयात शुल्कावरून भारत व अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. अगदी तशीच परिस्थिती अमेरिका व ब्राझीलमधील संबंधांची देखील आहे. ब्राझील-अमेरिकेतील तणाव काहीसा जास्तच आहे. अमेरिकेने ब्राझीलवर भारताप्रमाणेच ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू केलं आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांनी स्पष्ट केलं की अमेरिकेने त्यांच्यावर भरमसाठ आयात शुल्क लादलं असलं तरी ब्राझील त्वरित अमेरिकेवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादणार नाही. त्यानंतर दा सिल्वा यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्यापार चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. उभय देशांमधील चर्चा सध्या बंद आहेत. त्यामुळे हे संबंध अजून काही दिवस असेच राहू शकतात.