Donald Trump on Iran Missile Attack On US Base : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता निवळला आहे. मात्र, उभय देशांमधील युद्धविरामाआधीच अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्याची घोषणा करण्याची घाई केल्याचं पाहायला मिळालं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धविरामाआधीच समाजमाध्यमांवरून त्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतरही युद्ध चालू असल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इस्रायलबरोबर कोणताही शांतता करा झाला नसल्याचं जाहीर केल्यामुळे ट्रम्प तोंडघशी पडले. मात्र, आता १२ दिवसांच्या संघर्षानंतर हे युद्ध धांबलं आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या कथित शस्त्रविरामाआधी इराणने मोठं पाऊल उचललं होतं. अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणने कतारमधील अल-उदीद येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला केला होता. मात्र, या हल्ल्यापूर्वी अमेरिकेला पूर्वकल्पना दिल्याबद्दल ट्रम्प यांनी इराणचे आभार मानले.
डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
अमेरिकेच्या अध्यक्षांनी याबाबत ट्रूथ या समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये इराणचे आभार मानले व त्यांना कोपरखळी देखील मारली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “अमेरिकेने इराणचे आण्विक तळ नष्ट केल्यानंतर इराणकडून आलेली प्रतिक्रिया खूपच सौम्य होती. तेहरानने १४ क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी १४ क्षेपणास्त्रे आमच्या जवानांनी आकाशातच भेदली. तर, एका क्षेपणास्त्राला काही करण्याची आम्हाला गरजच वाटली नाही, कारण ते क्षेपणास्त्र अशा दिशेने जात होतं की त्याचा आम्हाला काहीच धोका नव्हता”.
ट्रम्प यांनी हल्ल्याची आघाऊ सूचनना दिल्याबद्दल इराणचे आभार मानले. ते म्हणाले, “आम्हाला आघाऊ सूचना (अर्ली नोटीस) दिल्याबद्दल मी इराणचे आभार मानू इच्छितो. यामुळे जीवितहानी टळली, तसेच कोणी जखमी झालं नाही”.
इराणच्या आण्विक तळांचं मोठं नुकसान
इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेने उडी घेत इराणमधील तीन आण्विक तळांवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणमधील तीन आण्विक तळ नष्ट करण्यात आल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. होता या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेचा हा हावा फेटाळून लावला होता. मात्र, आता इराणने म्हटलं आहे की अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांच्या आण्विक तळांचं मोठं नुकसान झालं आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बागाई यांनी अल जझीराशी बोलताना पुष्टी केली आहे की “आमच्या आण्विक तळांचं खूप मोठं नुकसान झालं आहे.”