Donald Trump top Aide Stephen Miller Accuses India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे व व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकारी स्टीफन मिलर यांनी भारताविरोधात वक्तव्य केलं आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करून रशियाच्या युक्रेनबरोबरच्या युद्धासाठी निथी पुरवत (फंडिंग) असल्याचा आरोप मिलर यांनी केला आहे. नवी दिल्लीने मॉस्कोबरोबरचा व्यापार बंद करावा यासाठी वॉशिंग्टन भारतावर दबाव निर्माण करत आहे. त्यासाठी ट्रम्प यांनी भारताविरोधात टॅरिफचं (आयात शुल्क) शस्त्र देखील उगारलं आहे.
व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर म्हणाले, “ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की भारताने रशियाकडून तेल खरेदी करून युद्धासाठी निधी पुरवणं चालू ठेवलं तर ते स्वीकार्य ठरणार नाही.” इंडो-पॅसिफिकमध्ये भारत अमेरिकेचा प्रमुख भागीदार आहे. मात्र, टॅरिफमुळे उभय देशांमध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण होऊ लागला आहे. अशातच ट्रम्प प्रशासनातील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने भारताबद्दल केलेली ही मोठी टिप्पणी आहे.
स्टीफन मिलर नेमकं काय म्हणाले?
मिलर म्हणाले, “ट्रम्प यांना एक अतुट नातं अपेक्षित आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्यात तसं नातं आहे. परंतु, भारताच्या रशियाबरोबरच्या व्यापाराबद्दल पुनर्विचार होणं गरजेचं आहे. तसेच भारताकडून युद्धासाठी होणाऱ्या वित्तपुरवठ्याबाबत वास्तववादी दृष्टीकोन बाळगण्याची आवश्यकता आहे. आपल्याला युक्रेनमध्ये शांतता निर्माण करायची आहे. त्यामध्ये ट्रम्प सर्व मित्र राष्ट्रांकडून सहकार्याची अपेक्षा करतात.”
भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्यास काय होईल?
अमेरिकी दंडाचा परिणाम म्हणून भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवल्यास ते इतर देशांकडून खरेदी करावं लागेल. त्यासाठी भारताला ९ ते ११ अब्ज डॉलर इतकी अतिरिक्त रक्कम मोजावी लागू शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. भारत हा कच्च्या तेलाची आयात करणारा चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तसेच भारत रशियाकडून तेल आयात करणारा दुसरा मोठा ग्राहक आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर अनेक पाश्चात्त्य देशांनी रशियावर निर्बंध लादले. रशियाकडून तेल खरेदी बंद केली. मात्र, या युद्धानंतर भारताने रशियाकडून तेलखरेदी ०.२ टक्क्यांवरून ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढवली. विशेष म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांपासून भारताला रशियाकडून कमी दराने तेल विकत मिळत आहे.