Donald Trump vs Elon Musk Russia Offers Musk political asylum : टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील तणाव चांगलाच वाढला आहे. यादरम्यान रशियातील खासदार दिमित्री नोविकोव्ह (Dmitry Novikov) यांनी मस्क हे रशियात राजकीय आश्रय घेऊ शकतात असे सूचक विधान केले आहे. ट्रम्प आणि मस्क यांच्या उघडपणे आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर स्टेट ड्यूमा कमिटी ऑन इंटरनॅशलम अफेअर्स (कम्युनिस्ट पार्टी ऑफ द रशियन फेडरेशन) चे पहिले उपाध्यक्ष असलेल्या नोविकोव्ह यांनी हे विधान केले आहे. रशियन वृत्तसंस्था TASS ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
रशिया एडवर्ड स्नोडेन प्रमाणे एलॉन मस्क यांना राजकीय आश्रय देईल का? असा प्रश्न माध्यमांकडून विचारण्यात आला होता. “मला वाटतं की मस्क यांचा गेम पूर्णपणे वेगळा असून त्यांना कोणत्याही राजकीय आश्रयाची आवश्यकता भासणार नाही, जरी त्यांना तशी गरज वाटली तर नक्कीच रशिया ते देईल,” असे उत्तर नोविकोव्ह यांनी दिले. त्यांनी असेही नमूद केले की मस्क यांनी गेल्या काही वर्षात एक प्रकारचा राजकीय संवाद निर्माण केला आहे ज्यामुळे वैयक्तिक मतभेद हे वेगळ्या प्रकारचे मतभेद राहतील.
या घडीला, तीन वर्षात डेमोक्रॅटीक पक्ष व्हाईट हाऊसमध्ये परत यावा हे मस्क यांच्यासाठी आवश्यक आहे असे मला वाटत नाही आणि तेही त्याचे स्वागत करण्यासाठी तयार नाहीत. म्हणून सध्या यामध्ये काही डावपेचांचे फरक आहेत आणि काही धोरणात्मक गोष्टी आहेत आणि त्यांचे ते पालन करत राहतील, असे मला वाटते, असेही नोविकोव्ह यांनी पुढे बोलताना म्हणाले.
व्हाईट हाऊसचे माजी रणनितीकार स्टीव्ह बॅन्नन यांनी मस्क हे एक बेकायदेशीर एलियन आहेत, ज्यांना अमेरिकेतून हद्दपार केले पाहिजे. तसेच बॅन्नन यांनी अमेरिकन सरकारने अब्जाधीश एलॉन मस्क यांची कंपनी स्पेएक्स हे देखील जप्त केली पाहिजे असेही म्हटले होते. या विधानानंतर दिमित्री नोविकोव्ह यांनी यावर भाष्य केले.
दरम्यान मॉस्को टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांना या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी या वादावर भाष्य करण्यास नकार दिला.
“हा अमेरिकेचा अंतर्गत मुद्दा आहे आणि आम्हाला त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही उद्देश नाही, आम्हाला ठाम विश्वास आहे की अमेरिकेचे अध्यक्ष स्वत:हून ही परिस्थिती हाताळतील,” असे पेस्कोव्ह पुढे बोलताना म्हणाले.
रशियाने यापूर्वी अमेरिकेचे व्हिसलब्लोअर एडवर्ड स्नोडेन आणि क्रेमलिन समर्थक ब्रिटिश ब्लॉगर ग्राहम फिलिप्स यांना राजकीय आश्रय दिला आहे.