Donald Trump on his Efforts Russia-Ukraine War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका टॉक शोमध्ये बोलताना त्यांना स्वर्गात जायचं असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्वर्गात स्थान मिळावं यासाठीच ते रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्न करत असल्याची त्यांनी कबुली दिली. फॉक्स न्यूजवरील फॉक्स अँड फ्रेंड्स या हलक्याफुलक्या कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले, ते जर रशिया-युक्रेन युद्ध मिटवू शकले तर त्यांना स्वर्गात जाण्याची संधी मिळू शकते. किंबहुना तशी संधी वाढेल. तसेच यावेळी त्यांनी कबूल केलं की सध्या त्यांना स्वर्गात स्थान मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मला स्वर्गात जाण्याची संधी मिळणं अवघड आहे. कारण मला नेहमीच ऐकायला मिळतं की मला या व्यवस्थेत (totem pole) सगळ्यात कमी महत्त्व आहे. मी टोटेम पोलच्या तळाशी आहे. तरी मला स्वर्गात जाण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हे युद्ध थांबवून मी तसा प्रयत्न नक्की करणार आहे.”
रशिया युक्रेन युद्धाबाबत ट्रम्प म्हणाले…
रशिया-युक्रेन युद्धावर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले, “या युद्धाने आपल्याला फटका बसत नाहीये. अमेरिकन लोकांचा जीव जात नाहीये, आपल्या सैनिकांना वीरमरण येत नाहीये. परंतु, रशियन व युक्रेनियन लोक त्यांच्या जवळच्या लोकांचा जीव गमावत आहेत. त्यांचे सैनिक मरत आहेत. सामान्य जनता भरडून निघत आहे. त्यामुळे हे युद्ध थांबलं”
ट्रम्प पुतिन व झेलेन्स्की यांची भेट घडवून आणणार?
तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ चालू असलेल्या युक्रेन-रशिया संघर्षावर अखेत तोडगा निघण्याच्या दृष्टीने पावलं पडण्यास सुरुवात झाली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन व ट्रम्प यांच्या अलास्कामधील भेटीनंतर अमेरिकेत ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट झाली. युरोपियन युनियन नेत्यांच्या मते लवकरच पुतिन व झेलेन्स्की यांची भेट होऊ शकते. ट्रम्प ही भेट घडवून आणणार असल्याचं म्हटलं आहे. या भेटीत युद्धविरामाबाबत चर्चा होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की त्यांनी झेलेन्स्की यांच्याशी प्रत्यक्ष व पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. आता ते स्वतः युक्रेन आणि रशियाबरोबर त्रिपक्षीय शिखर परिषद घेतील आणि युद्ध थांबवण्यासाठी महत्त्वाची चर्चा घडवून आणतील.