देर अल-बलाह : गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण मांडलेला २० कलमी प्रस्ताव हमासने रविवार संध्याकाळपर्यंत स्वीकारला पाहिजे, अन्यथा गाझामध्ये आणखी तीव्र लष्करी कारवाई करण्यात येईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दिला. पुढील आठवड्यात, ७ ऑक्टोबरला या युद्धाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यापूर्वी युद्ध थांबवून ओलिसांना परत आणण्यासाठी ट्रम्प आग्रही आहेत.
ट्रम्प यांनी सोमवारी मांडलेला शांतता प्रस्ताव इस्रायलने मान्य केला आहे. भारतासह पॅलेस्टिी नेते, अरबी राष्ट्र आणि इतर देशांनीही त्याचे स्वागत केले आहे. मात्र, हमासने अद्याप हा प्रस्ताव स्वीकारत असल्याचे किंवा नाकारत असल्याचे अधिकृतरित्या सांगितलेले नाही. मात्र, या प्रस्तावातील काही मुद्द्यांवर अधिक वाटाघाटी करण्याची गरज आहे, अशी भूमिका हमासचा एक नेता आणि युद्धसमाप्तीसाठी सुरुवातीपासून प्रयत्न करणाऱ्या इजिप्त आणि कतार या देशांनी मांडली आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात ५७ पॅलेस्टिीनी ठार
दुसरीकडे, इस्रायलने गाझा पट्टीवरील हल्ले सुरूच ठेवले असून शुक्रवारी त्यांनी केलेल्या हवाई आणि जमिनीवरून हल्ल्यामध्ये शुक्रवारी किमान ५७ पॅलेस्टिनी मारले गेले. तर गुरुवारी इस्रायलच्या हल्ल्यात दक्षिण गाझात किमान २९ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, गाझाकडे मदतपुरवठा घेऊन निघालेले कार्यकर्त्यांचे अखेरचे जहाजही इस्रायली सैन्याने शुक्रवारी अडवले.
वॉशिंग्टन डीसीच्या वेळेनुसार रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हमासने प्रस्तावाला मान्यता दिली पाहिजे. प्रत्येक देशाने सही केली आहे! शेवटची संधी असलेला हा करार मान्य केला नाही तर, हमासविरोधात यापूर्वी कधी झाली नव्हती अशी कारवाई केली जाईल. मध्यपूर्वेत या ना त्या मार्गाने शांतता प्रस्थापित होईलच! – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका