Donald trump xi jinping meeting : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तब्बल ६ वर्षांनंतर भेट झाली. दोन्ही देशांमधील व्यापार तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आयोजित चर्चेसाठी गुरुवारी दक्षिण कोरियामध्ये हे दोन नेते एकमेकांशी भेटले. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआ (Xinhua) च्या हवाल्याने रॉयटर्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळासाठी उत्तम संबंध राहतील असे सांगितले.
तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की ते “आजही व्यापार करारावर स्वाक्षरी करू शकतात” आणि दोन्ही नेत्यांनी “बऱ्याच गोष्टींवर आधीच सहमती दर्शविली आहे,” असेही ट्रम्प यावेळी म्हणाले. ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली समोरासमोर झालेली भेट होती, ही भेट आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (APEC) शिखर परिषदेच्या निमित्ताने झाली आहे. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की, दोन्ही देशांच्या ट्रेड टिम्समध्ये “आमच्या मूळ चिंतांच्या सोडवणुकीबाबत मूलभूत सहमती झाली आहे.”
दक्षिण कोरियामध्ये झाली भेट
दक्षिण कोरियातील बुसान या शहरातील एका हवाई तळावर ही भेट पार पडली. जानेवारीमध्ये ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही पहिली भेट होती. या भेटीपूर्वी अमेरिका आणि चीनमध्ये अनेक महिन्यांपासून व्यापार तणाव वाढल्याचे पाहायला मिळाले होते. दोन्ही देशांकडून एकमेकांना टॅरिफ वाढवण्याच्या धमक्या दिल्या गेल्या तसेच निर्यात निर्बंधही वाढवण्यात आले होते.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांना एक अत्यंत यशस्वी बैठकीची अपेक्षा आहे. इतकेच नाही तर त्यांनी शी हे अत्यंत चिवटपणे वाटाघाटी करणारे व्यक्ती असल्याचेही ट्रम्प म्हणाले. तसेच दोन्ही देश या चर्चेदरम्यान व्यापार करारावर स्वाक्षरी करू शकतात अशी शक्यताही ट्रम्प यांनी व्यक्त केली.
अनेक महिन्यांच्या व्यापार तणावानंतर दोन्ही बाजूंनी व्यापार करार होण्यासंबंधी आशावाद व्यक्त केला आहे. चीनने नुकतेच हाय-टेक उत्पादनांसाठी आवश्यक असलेल्या दुर्मिळ खनिजांवरील (rare-earth minerals) निर्यात निर्बंध वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता, तर ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लावण्यात येईल असे म्हटले होते. दरम्यान अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी रॉयटर्सला सांगितले की, त्यांना अपेक्षा आहे की चीन दुर्मिळ खनिजांवरील निर्बंध एक वर्षासाठी स्थगित करेल आणि substantial फ्रेमवर्क कराराचा भाग म्हणून अमेरिकन सोयाबीनची खरेदी पुन्हा सुरू करेल.
