Donald Trump Xi Jinping South Korea Meeting 2025: गेल्या वर्षी अमेरिकेची सूत्रे पुन्हा हाती घेतल्यापासून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे वाद निर्माण झाले आहेत. यामध्ये त्यांनी परदेशी आयातीवर लादलेल्या टॅरिफचाही समावेश आहे. याच टॅरिफवरून चीन आणि अमेरिकेत सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशात आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची दक्षिण कोरियात भेट झाली. या भेटीत शी जिनपिंग खूपच शांत पाहायला मिळाल्याने त्यांच्या या थंड प्रतिक्रियेची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

या भेटीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग एकत्र माध्यमांसमोर आले. यावेळी केवळ डोनाल्ड ट्रम्प यांनीच माध्यमांना प्रतिक्रिया दिली, तर शी जिनपिंग शांतपणे उभे असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आमच्यातील बैठक यशस्वी होईल अशी मला आशा आहे. पण, शी जिनपिंग यांच्याशी वाटाघाटी करणे खूप कठीण आहे. हे योग्य नाही.”

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात यापूर्वी सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये ओसाका येथे झालेल्या जी-२० परिषदेत द्विपक्षीय बैठक झाली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आज शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या बैठकीला “मोठे यश” म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी स्पष्ट केले की, नवीन चर्चेसाठी ते एप्रिलमध्ये चीनला भेट देणार आहेत. दक्षिण कोरियामध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय शिखर परिषदेनंतर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही नेत्यांनी चीनमधून दुर्मिळ धातूंच्या आयातीबाबत एक वर्षाचा करार आणि फेंटानिलशी संबंधित टॅरिफ कपात करण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास ४० मिनिटांची बैठक झाली. यानंतर ट्रम्प नियोजित वेळेनुसार थेट एअर फोर्स वनने इंडो-पॅसिफिक प्रदेशातील विविध देशांना दिलेल्या एक आठवड्याच्या भेटीनंतर वॉशिंग्टनला परतले.

“टिकटॉकशी संबंधित मुद्दा योग्यरित्या सोडवण्यासाठी चीन अमेरिकेबरोबर चर्चा करणार आहे”, असे दक्षिण कोरियामध्ये डोनाल्ड ट्रम्प-शी जिनपिंग यांच्यातील बैठकीनंतर चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने सांगितले. याव्यतिरिक्त, लोकप्रिय व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकच्या भवितव्याबद्दलची अनिश्चितता संपवण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीबद्दल कोणतेही तपशील चीनने दिले नाहीत.