US Vs Canada : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांपासून निर्णयांचा धडाका लावला आहे. आतापर्यंत जगातील अनेक देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. भारतावर देखील जवळपास ५० टक्के टॅरिफ लादलं असून त्याचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. असं असताना ट्रम्प यांनी आता कॅनडाला मोठा धक्का दिला आहे.

कॅनडाबरोबरच्या सर्व व्यापाराच्या वाटाघाटी अचानक स्थगित करण्याचा निर्णय नुकताच ट्रम्प यांनी घेतला होता. त्यानंतर आता आणखी एक मोठा निर्णय घेत कॅनडावर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका कॅनडाला बसण्याची शक्यता आहे. मात्र, ट्रम्प यांनी कॅनडावर अचानक अशा प्रकारचा अतिरिक्त टॅरिफ का लादलं? याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

अमेरिकेने कॅनडावर अतिरिक्त टॅरिफ का लादलं?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या भाषणामधील शब्दांची मोडतोड करत कॅनडातील एका प्रांतातील सरकारने जाहिरात केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. याच कारणास्तव ट्रम्प यांनी कॅनडाबरोबर सुरू असलेल्या व्यापार कराराच्या चर्चेला तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यानंतर आता कॅनडावर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याचाही निर्णय घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

कॅनेडियन आयातीवरील शुल्कात १० टक्के अतिरिक्त वाढ करत असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं की, “जाहिरातीत गंभीर आणि चुकीचं वर्णन आणि शत्रुत्वपूर्ण कृत्य केल्यामुळे मी कॅनडावरील आयातकर आता देत असलेलेल्या करापेक्षा १० टक्के जास्त वाढवत आहे.”

ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये जाहिरातीला फसवं म्हणत रोनाल्ड रीगन यांच्या भाषणात फेरफार केल्याचा आरोप केला. दरम्यान, अमेरिकेने कॅनडावर १० टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी म्हटलं की, “कॅनडा अमेरिकेबरोबर व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्यास तयार आहे.”