Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या संसदेत पोहचले. त्यावेळी नेत्यानाहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वोच्च नागरि पुरस्काराने सन्मानित केलं. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण सुरु होतं. त्यावेळी अचानक गोंधळ झाला आणि संसदेतून दोन खासदारांना बाहेर काढण्यात आलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान जी घोषणाबाजी झाली त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नेमकी काय घटना घडली?
डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या संसदेत भाषण करत होते, ते म्हणाले २० ओलिसांना परत आणलं जातं आहे. आता बंदुका शांत झाल्या आहेत. सायरनचा आवाजही शांत आहे. देवाच्या कृपेने आता अनंत काळाची शांतता या ठिकाणी प्रस्थापित झाली आहे. मिडल ईस्टचा हा एक ऐतिहासिक विजय आहे. हे डोनाल्ड ट्रम्प बोलत होते तितक्यात एका माणसाने जोरदार घोषणाबाजी सुरु केली आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध दर्शवला. घोषणाबाजी कऱणाऱ्यांनी नरसंहाराचं पोस्टरही हाती घेतलं होतं. यानंतर त्याच्यासह गाझाचं समर्थन करणाऱ्या दोन खासदारांना संसदेच्या बाहेर काढलं गेलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात अरब देशांचे आणि मुस्लिम नेत्यांचे आभार मानले. हमासवर दबाव निर्माण झाला पाहिजे यासाठी सगळे एकत्र आले ही बाब खरोखर चांगली आहे. इस्रायल आणि जगासाठी हा एक मोठा विजय आहे. सगळ्या देशांना शांततेसाठी एकत्र आलेलं पाहून मला चांगलं वाटतं आहे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
नेत्यानाहू काय म्हणाले?
इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू म्हणाले आता आपल्या शत्रूंना समजून चुकलं आहे की इस्रायलची ताकद काय आहे? ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला करणं ही त्यांची मोठी चूक होती. नेत्यानाहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्तुती सुमनं उधळली. “मी कधीही आमच्या कुठल्या मित्राला डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे इतक्या वेगाने आणि निर्णायक रुपात पुढे जाताना जगात पाहिलेलं नाही.” असं त्यांनी म्हटलं आहे.
शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर पहिल्या ७२ तासांमध्ये हमास २० ओलिसांना मुक्त करेल. ओलिसांचं किंवा कैद्यांचं हस्तांतरण करताना कुठलाही समारंभ, जल्लोष केला जाणार नाही. ही देवाणघेणाव प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत होणार नाही. कारण यापूर्वी हमासने काही ओलिसांना सोडलं होतं तेव्हा मोठा मीडिया इव्हेंट केला होता. त्यावेळी काही ओलिसांना प्रसारमाध्यमांसमोर हमासबद्दल चांगलं बोलण्यास सांगितलं होतं. यावेळी असे प्रकार टाळले जातील. इस्रायल ज्या कैद्यांची सुटका करणार आहे त्यामध्ये अनेक हाय प्रोफाइल नावं आहेत. मारवाँ बरघौती व अहमद सादत यांना देखील इस्रायल मुक्त करेल. मारवाँ बरघौती हे पॅलेस्टिनी विधान परिषदेचे सदस्य आहेत. बरघौती यांना सोडण्यास इस्रायल तयार नव्हतं. मात्र, अनेक तासांच्या वाटाघाटींनंतर इस्रायलच्या सरकारने बरघौती यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.