गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या २० जवानांच्या मृत्यूवरून देशातील राजकारण तापलं आहे. विरोधकांकडून मोदी सरकारवर प्रश्न विचारून टीका केली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्यानं सरकारला प्रश्न विचारत असून, गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये जखमी झालेल्या जवानाच्या वडिलांनी राहुल गांधी यांना राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे.
भारत व चीन सैनिकांदरम्यान गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले. या संपूर्ण घटनाक्रमावर सरकारकडून सुरूवातीला कोणतंही भाष्य न करण्यात आल्यानं प्रश्न उपस्थित केले गेले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांना सीमेवर सुरू असलेल्या घडामोडींविषयी प्रश्न विचारले होते.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणात गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी राहुल गांधी यांना राजकारण करण्याचं आवाहन केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं जवानाच्या वडिलांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. “भारतीय लष्कर सक्षम असून, चीनचा पराभव करू शकते. राहुल गांधी यांनी यात राजकारण करू नये. माझा मुलगा लष्करात लढला आणि यापुढेही लढत राहिल,” असं जखमी जवानाच्या वडिलांनी व्हिडीओत म्हटलं आहे.
The Indian Army is a strong army and can defeat China. Rahul Gandhi don’t indulge in politics in this…my son fought in the army and will continue fighting in the army: Father of injured Indian soldier who fought in #GalwanValleyClash (Amateur Video Source) pic.twitter.com/uGOdM2dJkM
— ANI (@ANI) June 20, 2020
आणखी वाचा- गलवान खोरे संघर्ष : अमित शाह यांनी राहुल गांधी यांना दिलं उत्तर; म्हणाले…
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना विचारले होते दोन प्रश्न
“चीनने भारतीय भूभागात घुसखोरी केली नाही,” असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं. “चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनची होती”, असं म्हणत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. “आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?”, असे प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारले होते.