काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी महिला सीमा हैदरने आपल्या चार मुलांसह बेकायदेशीरपणे भारतीय सीमा ओलांडली आहे. भारतीय तरुण सचिन मीना याच्या प्रेमात पडल्यानंतर तिने नेपाळमार्गे भारतात प्रवेश केला आहे. करोना काळात पब्जी खेळत असताना सीमा हैदरची ओळख सचिन मीना याच्याशी झाली होती. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर सीमा हैदरने भारतात येण्याचा निर्णय घेतला, असं बोललं जात आहे.

मात्र, सीमा हैदर ही पाकिस्तानी गुप्तहेर आहे, असा संशय काही लोकांकडून व्यक्त केला जात आहे. याबाबत भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सीमा हैदरची चौकशीही करण्यात आली आहे. सीमा आणि सचिन या जोडीवर सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, सीमा हैदरने ‘मला पाकिस्तानात परत पाठवू नका’ अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती. यावर आता स्वत: मुख्यमंत्री योगींनी उत्तर दिलं आहे.

हेही वाचा- “दुर्दैवाने आपल्या शेजारील…”, मणिपूर हिंसाचारावर योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सीमा हैदर आणि सचिन मीना प्रकरणावर सुरक्षा यंत्रणांकडून तपास केला जात आहे. तपासातून जो अहवाल समोर येईल, त्यानुसार योग्य तो विचार केला जाईल,” अशी प्रतिक्रिया योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. ते ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पाकिस्तानला गेलेली भारतीय महिला अंजूबाबत योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, “यावरही सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहे. हे प्रकरण दोन देशांशी संबंधित आहे. तपास यंत्रणा यावर काम करत आहेत.”