पती-पत्नीमधील वाद दोन देशांच्या संबंधाच्या आड येईल, असा विचारही कुणी केला नव्हता. सर्वोच्च न्यायालयात सध्या अशाच एका प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. रशियन महिला पत्नी आणि भारतीय नागरिक पती असलेल्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच चिंता व्यक्त केली. रशियन दूतावासाकडून संबंधित महिलेबाबत कोणतीही ठोस माहिती न मिळाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही असा कोणताही आदेश देऊ इच्छित नाही, ज्यामुळे भारत आणि रशियामधील संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो.
प्रकरण काय आहे?
भारतीय नागरिक सैकत बसू आणि त्याची पत्नी रशियन नागरिक व्हिक्टोरिया बसू यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना चार वर्षांचा एक मुलगा आहे. पण व्हिक्टोरिया बसू काही काळापूर्वी नेपाळमार्गे रशियाला पळून गेल्याचा आरोप सैकत याने केला आहे. दोघांमध्ये मुलाच्या ताब्यावरून न्यायालयीन संघर्ष सुरू असताना व्हिक्टोरियाने देश सोडल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
याआधी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला व्हिक्टोरियाचा ठावठिकाणा शोधण्याचे निर्देश दिले होते. यावर केंद्राने सांगितले की, लहान मुलाचा ताबा कुणाला द्यायचा? यावर न्यायालयात वाद असताना सदर महिला नेपाळमार्गे रशियात गेल्याचा अंदाज आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सदर महिला पळून गेल्यानंतर रशियन दूतावासाशी संपर्क साधण्याचेही निर्देश दिले होते. मात्र रशियन दुतावासाने या प्रकरणात उदासीनता दाखविल्यामुळे या प्रकरणात कोणताही दिलासा सैकत बसूला मिळू शकलेला नाही.
या प्रकरणावर खंडपीठाने चिंता व्यक्त केली. आम्ही असा कोणताही निकाल देणार नाही, ज्यामुळे दोन देशाच्या संबंधात तणाव निर्माण होईल. पण लहान मुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे एक गंभीर प्रकरण आहे. आम्ही एवढीच अपेक्षा करू शकतो की, सदर लहान मुलगा त्याच्या आईबरोबर सुरक्षित आणि निरोगी असावा. तो लहान मुलगा मानवी तस्करी किंवा रशियातील बाल शोषणाचा बळी पडलेला नसावा, अशी अपेक्षा करूयात.
याबरोबरच खंडपीठाने भारताच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा रशियन दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकरणात काही मदत मिळते का? हे पाहण्यास सांगितले. यासाठी एक आठवड्याची मुदतही देण्यात आली.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, मॉस्कोमधील भारतीय दूतावासातील राजनैतिक अधिकाऱ्यांनी रशियन यंत्रणेशी संपर्क साधला होता. मात्र तिथल्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. नेपाळमधून व्हिक्टोरियाला पळून जाण्यास ज्या लोकांनी मदत केली, त्यांची विचारपूस करण्यास दिल्ली पोलिसांना सहकार्य केले जात आहे, असेही परराष्ट्र खात्याने सांगितले.
दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी भारतातील रशियन दूतावासाशी संपर्क साधला होता, मात्र त्यांना फारशी मदत मिळू शकली नाही.
