भारताच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती यांचं शनिवारी (दि.२९) निधन झालं, त्या १०३ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूट (एनएचआय) येथे गेल्या ११ दिवसांपासून उपचार सुरु होते. दरम्यान, त्यांना न्यूमोनिया झाला होता तसेच त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनएचआयच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या डॉ. पद्मावती यांना सन १९६७ मध्ये पद्मभूषण तर सन १९९२ मध्ये पद्मविभूषण किताबाने गौरविण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांना हार्वर्ड मेडिकल इंटरनॅशनल अवॉर्ड, डॉ. बी. सी. रॉय अवॉर्ड आणि कमला मेनन रिसर्च अवॉर्डनेही गौरविण्यात आले आहे.

डॉ. पद्मावती या अविवाहित होत्या. सन १९५० पासून त्या दिल्लीच्या वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय होत्या. रंगून मेडिकल कॉलेज आणि त्यानंतर इंग्लंडमधून मेडिसीनमध्ये डिग्री घेतल्यानंतर त्या दिल्लीत आल्या. यावेळी त्यांच्याबाबत देशाच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर यांना माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ डॉ. पद्मावती यांना लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये शिकवण्याचा आग्रह धरला. त्यानंतर सन १९७६मध्ये त्यांनी मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या प्रिसिंपल-डायरेक्टरपदाची जबाबदारी सांभाळली. हिंदी, तमिळ आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या डॉ. पद्मावती यांना भेटलेल्या लोकांना आपण जणू थेट इतिहासाशी बोलतो आहोत असं वाटायचं. पं. जवाहरलाल नेहरु, लाल बहाद्दुर शास्त्री, इंदारा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयींसोबतच्या भेटींबाबत त्या नेहमी बोलत असायच्या.

दरम्यान, डॉ. पद्मावती यांच्या निधनानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, “दिल्ली नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटच्या संचालक आणि ऑल इंडिया हार्ट फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. एस आय पद्मावती यांना माझं विनम्र अभिवादन. पद्मभूषण पुरस्कारार्थी असलेल्या डॉ. पद्मावती भारताच्या पहिल्या हृदयरोगतज्ज्ञ होत्या त्यांनी पहिलं हृदयरोग क्लिनिक आणि प्रयोगशाळा सुरु केली होती. त्या एक भन्नाट व्यक्तिमत्व होत्या. वयाच्या १०३व्या वर्षापर्यंत आठवड्यातील पाच दिवस बारा-बारा तास त्यांनी काम केलं. ज्यावेळी हृदयरोगासंबंधी उपचारांबाबत भारतीयांना काहीही माहिती नव्हतं त्या काळात त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अनेक पराक्रम केले. असा पराक्रम गाजवणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr padmavati among indias top cardiologists dies at 103 aau
First published on: 31-08-2020 at 14:49 IST