देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले आहेत. या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले होते. राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मुर्मू आघाडीवर होत्या. तिसऱ्या फेरीपर्यंत मुर्मू यांना वैध मतांपैकी ५० टक्के मते मिळाली.

देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अधिकाधिक पाठिंबा मिळावा म्हणून मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांनी देशभर दौरे केले होते. मात्र या निवडणुकीमध्ये मुर्मू यांचा विजय झाला. या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. त्या येत्या २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता.

दुसऱ्या फेरीत ८१२ मतांच्या फरकाने आघाडीवर

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच द्रौपदी मुर्मू आघाडीवर होत्या. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत त्या ८१२ मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. मुर्मू यांना दुसऱ्या फेरीपर्यंत १३४९ मते मिळाली. या मतांचे मूल्य ४,८३,२९९ आहे. तर दुसऱ्या फेरीपर्यंत सिन्हा यांना ५३७ मते मिळाली होती. या मतांचे मुल्य १,८९, ८७६ आहे.

पाहा व्हिडीओ –

मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत मुर्मू यांना मिळाली ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते

मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओदिशा आणि पंजाब या राज्यातील लोकप्रतिनिधींनी दिलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. या फेरीत एकूण १३३३ मते वैध ठरली. यातील ८१२ मते मुर्मू यांना तर ५२१ मते सिन्हा यांना मिळाली. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीपर्यंत ३२१९ मते वैध ठरली. या मतांचे मूल्य ८,३८,८३९ एवढे ठरले. तिसऱ्या फेरीपर्यंतच्या वैध मतापैंकी मुर्मू यांना २१६१ मते मिळाली, ज्याचे मूल्य ५,७७,७७७ एवढे आहे. तर सिन्हा यांना १०५८ मते मिळाली. या मतांचे मूल्य २६१०५२ एवढे आहे. म्हणजेच तिसऱ्या फेरीपर्यंत वैध मतांपैकी ५० टक्क्यांपेक्षाही जास्त मते मुर्मू यांना मिळाली

१७ खासदारांची मतं फुटली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत देशभरातील एकूण १७ खासदारांची मतं फुटली आहेत. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केला. परिणामी मुर्मू शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्या आणि त्यांचा विजय झाला.