Hyderabad Police Commissioner on Kurnool Bus Tragedy: हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या खासगी स्लीपर बसला दुचाकीची धडक बसल्यानंतर लागलेल्या आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. आंध्रप्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात घडलेल्या या अपघातामुळे रस्ते वाहतुकीतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. या घटनेनंतर हैदराबादचे पोलीस आयुक्त व्हीसी सज्जनार यांनी मद्यपी चालकांबाबत एक मोठे विधान केले आहे. ज्यावर आता चर्चा होऊ लागली आहे.
पोलीस आयुक्त व्ही. एस. सज्जनार म्हणाले की, मद्यपी चालक हे दहशतवादी असतात आणि निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात घालणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. खासगी बसने दुचाकीला धडक दिल्यानंतर हा अपघात घडला. ज्यात दुचाकीस्वार शिव शंकरसह बसमधील १९ जणांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याच्यामुळेच हा भीषण अपघात घडल्याचे सज्जनार म्हणाले.
व्हीएस सज्जनार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ते म्हणाले, “मद्यधुंद चालक हे दहशतवादी असतात आणि त्यांच्या कृती रस्त्यांवरील दहशतवादी कृत्यांसारख्याच असतात. २० निष्पाप लोकांचा बळी घेणारा कुर्नूल बस अपघात खरंतर अपघात नव्हता. तो एक टाळता येणारा नरसंहार होता. एका मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या बेफिकीर आणि बेजबाबदार वर्तनामुळे सदरचा अपघात झाला.”
सज्जनार पुढे म्हणाले, सदर कृत्य हे संपूर्ण कुटुंबांना उध्वस्त करणारे निष्काळजीपणाचे एक गुन्हेगारी कृत्य होते. मी माझ्या विधानावर ठाम आहे. मद्यधुंद चालक हे दहशतवादीच असतात. ते अनेकांचे जीवन, कुटुंब आणि भविष्य उध्वस्त करतात. अशी कृत्य कधीही सहन केली जाणार नाहीत. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांना हैदराबाद पोलीस कोणतीही दया दाखवणार नाही.
मद्यपान करून गाडी चालवताना आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कायद्याचा सामना करावा लागेल. निष्पाप जीव धोक्यात घालणाऱ्यांना कोणतीही उदारता किंवा दया, माया दाखवली जाणार नाही, असेही पोलीस आयुक्त सज्जनार म्हणाले.
कसा झाला अपघात?
शुक्रवारी रात्री बी. शिव शंकर मद्याच्या नशेत असताना दुचाकी बेदरकारपणे चालवत होता. एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पहाटे २:२४ वाजता इंधन भरताना दिसतो. यावेळी त्याचे दुचाकीवर नियंत्रण नसल्याचे दिसते. तसेच पहाटे २.३९ वाजता दुचाकीची बसला भीषण टक्कर झाली. त्यानंतर दुचाकी बसखाली ३०० मीटर दूरपर्यंत ओढली गेली. यात दुचाकीची इंधन टाकी फुटली आणि त्यामुळे आग लागल्याचा अंदाज बांधला जात आहे.
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या या खासगी बसमध्ये ४६ लाख रुपये किमतीचे २३४ स्मार्टफोन होते. लॉजिस्टिक सेवेद्वारे एका व्यापाराने हे पाठवले होते. फोनमधील लिथियम-आयन बॅटरीचा स्फोट होऊन आग आणखी पसरली असल्याचाही अंदाज व्यक्त होत आहे.
