USA vs India, China, Russia: रशियन तेल खरेदी करणाऱ्या आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या युद्धयंत्रणेचा पोसणाऱ्या प्रत्येक देशाला, भारतासारखीच मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी दिला आहे. एनबीसीच्या मीट द प्रेस या कार्यक्रमात बोलताना लिंडसे ग्रॅहम म्हणाले की, त्यांनी नुकतेच (शुक्रवारी) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळले.

“शनिवार हा (पुतीन यांच्याबाबतचा) दहा दिवसांचा अंतिम मुदतीचा दिवस होता. चीनबद्दल ट्रम्प यांच्या मनात खूप काही आहे. त्यांना तेल खरेदी करणाऱ्या आघाडीच्या पाच देशांची अचूक माहिती आहे. त्यांना ठाऊक आहे, हे कोण आहेत. आणि जर पुतीन यांच्यासह हा संघर्ष चांगल्या प्रकारे संपला नाही, तर रशियन तेल खरेदी करून रशियातील युद्धयंत्रणा सुरू ठेवणाऱ्या प्रत्येक देशाला भारतासारखीच, मोठी किंमत मोजावी लागेल”, असे ग्रॅहम यांनी स्पष्ट केले.

“मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे युद्ध अशा प्रकारे संपवतील की ते तिसरे महायुद्ध रोखतील आणि चीनला तैवान ताब्यात घेण्यास प्रोत्साहन मिळणार नाही. आम्ही पुतीन यांना अपमानित करण्याचा प्रयत्न करत नाही, तर असा करार करण्याच्या प्रयत्नात आहोत, ज्यामुळे तिसरे महायुद्ध होणार नाही, याची खात्री होईल”, असे ग्रॅहम म्हणाले.

ग्रॅहम यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी चीनबद्दल आणि रशियन तेल खरेदी करणाऱ्या इतर दोन देशांबद्दलही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

ग्रॅहम म्हणाले की, “पुतीन यांना निर्बंधांची पर्वा नाही. ते निर्बंध टाळतात. त्यांना किती रशियन लोक मरतील, याची पर्वा नाही. पण जर आपण त्यांच्या ग्राहकांचा पाठलाग केला, तर ते हे सहन करू शकत नाहीत आणि जगू शकत नाहीत. त्यांचे संपूर्ण ध्येय त्यांच्या ग्राहकांना म्हणजेच भारताला, चीनला आणि ब्राझीलला चिरडणे आहे.

जर तुम्ही रशियाचे तेल खरेदी करत राहिलात आणि त्यांच्या युद्धयंत्रणेला आधार देत राहिलात, तर तुम्हाला आमच्या अर्थव्यवस्थेत प्रवेश नाकारला जाईल. ही एक नवीन रणनीती आहे. जर हे थांबले नाही, तर ट्रम्प पुतीन यांच्या ग्राहकांचा पाठलाग करण्याच्या बाबतीत पूर्णपणे तयार आहेत. तेल आणि वायूच्या उत्पन्नाशिवाय रशिया कोसळेल.”

Live Updates