China Earthquake : चीनमध्ये ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) दिली आहे. शुक्रवारी (१६ मे) सकाळी ६:२९ वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं सांगितलं जात आहे. या भूकंपाची खोली १० किमी खोलीवर नोंदली गेली आहे. भूकंप विज्ञान केंद्राने या संदर्भातील माहिती एक्स अकाउंटवरून दिली आहे.

या भूकंपाचे केंद्र २५.०५ उत्तर अक्षांश आणि ९९.७२ पूर्व रेखांशावर होते अशी माहिती सांगण्यता आली आहे. दरम्यान, १२ मे रोजी देखील पहाटे २:४१ वाजता तिबेट आणि चीनच्या काही भागात ९ किमी खोलीवर ५.६ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. आज झालेल्या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवितहानी किंवा कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याचं वृत्त सध्या तरी समोर आलेलं नाही. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

पाकिस्तानमध्येही काही दिवसांपूर्वी भूकंपाचा धक्का बसला होता

पाकिस्तानमध्येही १० मे रोजी ४.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. माहितीनुसार, मध्य रात्री १.४४ वाजता ४.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे तीव्र धक्के पाकिस्तानात जाणवले होते. याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली होती. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलं नव्हतं.

या भूकंपाचं केंद्र १० किलोमीटर खोलीवर होतं आणि त्याचं स्थान २९.६७ अंश उत्तर अक्षांश आणि ६६.१० अंश पूर्व रेखांशावर नोंदवलं गेल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, त्याआधी १२ एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली होती.