Afghanistan Earthquake Updates: अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भीषण भूकंप झाला आहे. अफगाणिस्ताच्या पूर्वेकडील भागात रविवारी रात्री उशीरा ६.० तीव्रतेचा भीषण भूकंप झाला. किमान ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २,५०० लोक जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे अनेक घरे कोसळली असून या घरांच्या ढिगाऱ्यांखालून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून शोध घेतला जात आहे.
अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री ११:४७ वाजता हा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र हे नांगरहार प्रांतातील जलालाबादपासून सुमारे २७ किलोमीटर ईशान्येला होते. फक्त ८ किलोमीटर खोलीवर झालेल्या भूकंपामुळे कुनार प्रांतात मोठी हानी झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकासान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कुनार जिल्ह्याला सर्वाधिक फटका
कुनार आपत्ती व्यवस्थापन प्राथिकरणाने पुष्टी केला आहे की सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये नूर गुल, सोकी, वाटपूर, मानोगी आणि चापादरे यांचा समावेश आहे, येथे शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, फक्त कुनार गावातच किमान २० मृत्यू आणि ३५ जण जखमी झाले आहे.
भूकंपात झालेल्या नुकसानीसंबधी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एकाच गावात ३० जण मृत्यूमुखी पडल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच विखूरलेल्या वस्त्यांमध्ये झालेल्या नुकसानाची अचूक आकडेवारी गोळा करण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
“मृतांची आणि जखमींची संख्या मोठी आहे, पण या भागात पोहचणे अवघड असल्याने आमच्या टीम अजूनही घटनास्थळी आहेत,” असे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शाराफत झमान यांनी त्यांच्या निवेदनात सांगितले.
शेकडो जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असे या प्रांताचे माहिती प्रमुख नजीबुल्लाह हनीफ यांनी सांगितले. रस्ते कमी प्रमाणात असलेल्या दुर्गम भागातून माहिती मिळेल त्यानुसार मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वाच्या सीमेला लागून असलेल्या भागात मध्यरात्री सुमार १० किमी खोलीवर झालेल्या भूकंपानंतर अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत, दुर्गम भाग असेलेल्या या प्रांतामधील अनेक जिल्ह्यांमध्ये बचाव पथके काम करत होती, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानात नेहमी भूकंप होत असतात, विशेषतः हिंदूकुश पर्तवरांगांमध्ये याचे प्रमाण दास्त आहे. येथे इंडियन आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकाशी मिळतात. गेल्या वर्षी याच्या पश्चिमेकडे ओळीने झालेल्या भूकंपांमध्ये १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.