ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कट्टर हिंदूत्ववाद्यांवर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी निशाणा साधला आहे. नावात सेना किंवा फौज असलेल्या पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करावी, अशी मागणी देवरा यांनी केली आहे.
‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांची मंगळवारी संध्याकाळी राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. गौरी लंकेश या देशातील असहिष्णुता आणि हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या उन्मादाच्या प्रखर विरोधक होत्या. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येने दुःख झाले. त्यांना न्याय मिळेल, अशी आशा आहे, असे ट्विट त्यांनी केले. यानंतरच्या ट्विटमध्ये देवरा म्हणाले, ज्या राजकीय पक्षांच्या नावात सेना किंवा फौज असा शब्द आहे, त्यांची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली पाहिजे. या नावांमधून हिंसेला चिथावणी मिळते आणि हिंसेचे समर्थन होते. भारतात काही युद्ध सुरु नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. देवरा यांनी या ट्विटच्या माध्यमातून उजव्या विचारधारेच्या पक्षांवर टीकास्त्र सोडले.
गौरी लंकेश यांच्या हत्येचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. एक क्रांतिकारी आवाज क्रूर पद्धतीने शांत करण्यात आला, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी म्हटले आहे. तर जावेद अख्तर यांनी एकाच विचारधारेच्या लोकांची हत्या का होत आहे, असा सवाल उपस्थित केला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील गौरी लंकेश यांच्या हत्येवरुन भाजपवर निशाणा साधला. देशामध्ये सध्या संघ आणि भाजपविरोधात बोलणाऱ्यांना संपवलं जातंय, अशी टीका त्यांनी केली.
Political parties whose names end with 'Sena' or 'Fauj' insinuate & justify violence. EC must disqualify them. India isn't at war
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) September 6, 2017
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

