सक्तवसुली संचालनालयाने ओडिशास्थित एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना (एमडी) अटक केली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली. उद्योग समूहांना बनावट बँक हमी देत असल्याच्या संशयावरून या व्यवस्थापकीय संचालकांवर ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहाला दिलेल्या कथित ६८ कोटींच्या हमीचाही समावेश आहे. या प्रकरणी ईडीने केलेली ही पहिली अटक असल्याचे सांगण्यात आले.
ईडीने शुक्रवारी भुवनेश्वरस्थित ‘बिस्वाल ट्रेडलिंक’ या कंपनीविरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून शोधकारवाई सुरू केली होती. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ सारथी बिस्वाल यांनी भुवनेश्वरमधून आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) अटक करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली.
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) नोव्हेंबर २०२४मध्ये बिस्वाल ट्रेडलिंक कंपनीने ‘सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या कंपनीला बनावट बँक हमी दिल्याचा आरोपावरून कंपनी, त्यांचे संचालक आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या आधारे बिस्वाल यांना अटक करण्यात आली. यासह ईडीने कर्ज घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी ५ ऑगस्टला दिल्लीमधील मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
ईडीने २४ ते २६ जुलैदरम्यान मुंबईमधील ३५पेक्षा जास्त ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोध कारवाई केली होती. त्याच संबंधात अंबानी यांना समन्स बजावण्यात आले आहे. अनिल अंबानी यांनी १० हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या कर्जाची रक्कम इतरत्र वळवल्याचा आरोप आहे. यामध्ये येस बँकेकडून २०१७ ते २०१९दरम्यान घेतलेल्या तीन हजार कोटींच्या रकमेच्या गैरवापराचाही समावेश आहे.