रांची : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांची चौकशी सुरू केली. सोरेन यांच्या अधिकृत निवासस्थानी दुपारी १ वाजता ‘ईडी’चे अधिकारी पोहोचले. झारखंडमध्ये मोठय़ा प्रमाणात जमिनीची मालकी बेकायदा पद्धतीने गुंडांना देण्यात आल्याचा आरोप आहे. ईडीने या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांना अटक केली असून त्यामध्ये २०११च्या तुकडीचे सनदी अधिकारी छावी रंजन यांचाही समावेश आहे. या प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सोरेन यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. यापूर्वी सात वेळा ‘ईडी’समोर जाण्याचे टाळले होते.