Chhangur Baba Racket : उत्तर प्रदेशमधील स्वयंघोषित धर्मगुरू जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा सध्या चर्चेत आहे. छांगूर बाबाने शेकडो हिंदू मुलींचं धर्मांतर केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर हिंदू मुला-मुलींच्या धर्मांतरासाठी मुस्लीम तरूणांची त्याने मोठी फौज तयार केली होती. या प्रकरणात उत्तर प्रदेशने एटीएसने छांगूर बाबाला अटक केलं आहे. गरीब, विधवा आणि अशिक्षित महिलांना लक्ष्य करत त्यांच्या धर्मांतराचं रॅकेट छांगूर बाबा चालवत असल्याचा आरोप आहे.
छांगूर बाबाला मुस्लीम देशांमधून धर्मांतराच्या रॅकेटसाठी तब्बल ५०० कोटींचा निधी मिळत असल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता ईडीची एन्ट्री झाली आहे. छांगूर बाबा प्रकरणाशी संबंधित १४ ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. आज पहाटे ईडीने ही कारवाई केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
छांगूर बाबा धर्मांतर प्रकरणात ईडीने उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील १२ आणि मुंबईतील दोन अशा १४ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. याममध्ये बलरामपूरमधील उत्रौला आणि मुंबईतील वांद्रे, माहीम या ठिकाणी ईडीने पहाटे ५ वाजता छापे टाकले आहेत. तसेच या धर्मांतर रॅकेटमध्ये एका बँक खात्यातून २ कोटी रुपये दुसऱ्या एका व्यक्तीला हस्तांतरित करण्यात आल्याचा देखील संशय ईडीला आहे. या प्रकरणात छांगूर बाबाची सहकारी सहकारी नितू ऊर्फ नसरीन आणि तिचा पती नवीन यांनाही यूपी एटीएसने अटक केली आहे.
Chhangur conversion case | The Enforcement Directorate is conducting searches at 14 premises, including 12 in Utraula, Balrampur, Uttar Pradesh, and two in Mumbai. Search started today at 5 am: Official Sources pic.twitter.com/Zap7S4hONX
— ANI (@ANI) July 17, 2025
उत्तर प्रदेश एटीएसच्या तक्रारीच्या आधारे ईडीने ९ जुलै रोजी कथित धर्मांतर रॅकेटशी संबंधित मनी लाँड्रिंग गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे. छांगूर बाबानी मागच्या काही वर्षांत १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जमवल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, हे सर्व आरोप छांगूर बाबाने फेटाळून लावले आहेत. “मी निर्दोष आहे. मला काहीही माहिती नाही,” असं छांगूर बाबाने अटकेनंतर म्हटलं आहे.
#WATCH | Uttar Pradesh | Chhangur conversion case | The Enforcement Directorate is conducting searches at 14 premises, including 12 in Utraula, Balrampur, Uttar Pradesh, and two in Mumbai.
— ANI (@ANI) July 17, 2025
(Visuals from Balrampur) pic.twitter.com/EZfHnT6htZ
छांगूर बाबा प्रकरण नेमकं काय आहे?
एकेकाळी उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात अंगठ्या विकणारा छंगूर बाबा आज कोट्यवधींचा मालक आहे. मुंबई आणि सौदी अरेबियाचा दौरा केल्यानंतर त्याच्या आयुष्यात हे परिवर्तन घडल्याचे सांगितलं जातं. मागच्या दशकात छांगूर बाबाने स्वतःला पीर बाबा किंवा हजरत जलालुद्दीन असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छांगूर बाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बलरामपूर आणि उत्तर प्रदेशमधील इतर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रातील पुण्यात अनेकठिकाणी मालमत्ता जमवल्या आहेत. ज्याची किंमत ३०० कोटी रुपयांहून अधिक आहे. आरोपी छांगूर बाबाकडे अनेक आलिशान गाड्या, बंगले आणि तीन डझन मालमत्ता आहेत. यातील बहुसंख्या मालमत्ता त्याचे सहकारी किंवा स्वयंसेवी संस्थांच्या नावाने नोंदणीकृत आहेत.
आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, छांगूर बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मागच्या काही वर्षांत इस्लामिक देशात ५० हून अधिक दौरे केले आहेत. तसेच आरोपीच्या एनजीओशी संबंधित डझनभर बँक खात्यांमध्ये १०६ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारामागे परदेशी निधी असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला. ५ जुलै रोजी छांगूर बाबा आणि त्याची नसरीन उर्फ नीतू रोहरा यांना अटक करण्यात आली. भारतीय दंड संहिता आणि उत्तर प्रदेश अवैध धर्मांतर विरोधी कायदा, २०२१ नुसार या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच गुन्ह्यात नसरीनचा पती जमालुद्दीन ऊर्फ नवीन रोहरा आणि जलालुद्दीनचा मुलगा मेहबूब यांनाही एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली होती. आणखी १४ आरोपींचा शोध एटीएसकडून घेतला जात आहे. छांगूर बाबाने शेकडो हिंदू मुलींचं धर्मांतर केल्याचा आरोप आहे.