देशातील २४ विद्यापीठं बोगस, उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर; महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील २४ स्वयंघोषित विद्यापीठं बनावट असल्याचं जाहीर केलं आहे

Education Minister Dharmendra Pradhan, UGC, University Grants Commission,
विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील २४ स्वयंघोषित विद्यापीठं बनावट असल्याचं जाहीर केलं आहे (File Photo: PTI)

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील २४ स्वयंघोषित विद्यापीठं बनावट असल्याचं जाहीर केलं असून दोन विद्यापीठांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला आहे. लोकसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नावर उत्तर देताना धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली.

“विद्यार्थी, पालक, नागरिक तसंच प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे युजीसीने २४ विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. “याशिवाय लखनऊमधील भारतीय शिक्षा परिषद आणि नवी दिल्लीमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंटकडून युजीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही संस्थांचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली,

सर्वाधिक बोगस विद्यापीठं असणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात आठ बोगस विद्यापीठं असून दिल्लीमध्ये सात आहेत.ओडिशा आणि बंगालमध्ये प्रत्येकी दोन बोगस विद्यापीठं असून कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पाँडिचेरीत प्रत्येकी एक विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील हे विद्यापीठ नागपुरात असून राजा अरेबिक युनिव्हर्सिटी असं नाव आहे.

या विद्यापीठांवरील कारवाईसंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, “युजीसीने या विद्यापीठांसंबंधी हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध केली आहे”. तसंच आयोगाने राज्याचे सचिव, शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांच्या अख्त्यारित असणाऱ्या अशा विद्यापीठांवर कारवाई करण्यास सांगितलं असल्याचं ते म्हणाले आहेत. यासोबत अवैध डिग्री देणाऱ्या या संस्थांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Education minister dharmendra pradhan 24 universities declared fake by ugc most from up sgy

ताज्या बातम्या