हमास, हिजबुल्ला आणि अन्य दहशतवादी गटांच्या मदतीने इजिप्तमध्ये अतिरेकी कारवाया करण्याच्या तसेच, हेरगिरीचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवीत इजिप्तचे पदभ्रष्ट अध्यक्ष मोहम्मद मोर्सी आणि अन्य ३५ जणांविरोधात येत्या १६ फेब्रुवारीपासून खटला सुरू होत आहे. सन २००५ ते २०१३ या कालावधीत मोर्सी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गुन्हय़ांविरोधात हा खटला कैरो येथील अपीलीय न्यायालयात चालविला जाणार आहे.
कैरो न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुस्लीम ब्रदरहूडचे मात्र कंबरडे मोडण्याचीच चिन्हे आहेत. ६२ वर्षीय मोर्सीसह ब्रदरहूडचे ६२ जण सध्या गजाआड आहेत, तर उर्वरित १६ जणांविरुद्ध अटक आदेश जारी करण्यात आले आहेत. या सर्वावर ठेवण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर असून ते दोषी ठरल्यास त्यांना देहदंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते, अशी माहिती तेथील कायदेतज्ज्ञांनी दिली.

मोर्सी सध्या अलेक्झांड्रिया येथील तुरुंगात असून, त्यांच्यावर सध्या दोन खटले सुरू आहेत. त्यांच्यावर असलेल्या खुनाच्या खटल्याची सुनावणी १ फेब्रुवारी रोजी तर, २०११ मधील तुरुंगभेद प्रकरणाची सुनावणी २८ जानेवारी रोजी होणार आहे.

मोर्सीविरोधातील आरोप
हमास, हिजबुल्ला आणि अन्य दहशतवादी संघटनांच्या मदतीने इजिप्तमध्ये दहशतवाद पसरविणे.
इजिप्तची संरक्षणविषयक रहस्ये अन्य देशांना पुरविणे.
दहशतवादी संघटनांना अर्थसाहाय्य करणे.
ब्रदरहूडचे आंतरराष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लष्करी प्रशिक्षण यंत्रणेचा वापर करणे.