शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात मोठं सत्तांतर झालं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकार जाऊन भाजपा व शिवसेनेतील बंडखोर गटाने सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, त्यानंतर अनेक दिवस उलटूनही शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होतेय. अशातच शनिवारी (६ ऑगस्ट) शिंदे व फडणवीस दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी हा दौरा मंत्रीमंडळ विस्ताराबाबत नसल्याचं सांगितलं. ते दिल्लीत विमानतळावर पोहचल्यावर माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “दिल्लीत होणारी बैठक शासकीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवबाबत बैठक ठेवली आहे आणि उद्या नीती आयोगाची बैठक आहे. मुख्यमंत्र्यांसोबतची ही बैठक दरवर्षी होते. या दोन्ही महत्त्वाच्या बैठका असल्याने मी दिल्लीला आलो आहे.”

“दिल्ली दौऱ्याचा आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा काहीही संबंध नाही”

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याचा आणि राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला. “मी या दोन बैठकांसाठी आलो आहे आणि आमचा मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. त्याला कोणतीही अडचण किंवा अडथळा नाही,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

“राज्यातील कोणतंही काम थांबवलेलं नाही”

“राज्यातील कोणतंही काम थांबवलेलं नाही. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घ्यायचे ते घेतले आहेत. ते काम कोठेही थांबलेलं नाही. लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल,” असंही शिंदेंनी नमूद केलं.

हेही वाचा : आधी पक्षप्रमुख उल्लेख टाळला, आता थेट ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले…

पुढच्या आठवड्यापर्यंत मंत्रीमंडळ विस्तार होईल का? असा प्रश्न विचारला असता, पुढील आठवडा कशासाठी, त्याआधी मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं शिंदे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोंदियातील महिलेवर झालेल्या अत्याचारावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “महिलेवरील अत्याचाराबाबत पोलीस तपास करत आहेत. कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”