EC to Announce Assembly Election Dates 2023: भारतीय निवडणूक आयोग आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड , मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीआधी सर्व राजकीय पक्षांसाठी या विधानसभेच्या निवडणूका म्हणजे एक सेमी फायनलच असणार आहे. सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारने आणि सर्व विरोधी पक्षांनी या पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावलेली पाहायला मिळत आहे.
PTI च्या वृत्तानुसार, भारतीय निवडणूक आयोग आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा, नामांकन दाखल करणे आणि ते परत घेण्याच्या तारखांची घोषणा करणार आहे.
हेही वाचा : Video: “हे आमचं ९/११..”, युद्ध चिघळलं; इस्रायलचं हवाई दल गाझा पट्टीत शिरलं!
मिझोराम, छत्तीसगड , मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत समाप्त होणार आहे. निवडणूक आयोग साधारणपणे विधानसभेचा कार्यकाळ संपण्याआधी सहा ते आठ आठवडे आधी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करत असते. आगामी पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निडणुकांमध्ये सत्तेत असणारा भारतीय जनता पक्ष, मुख्य विरोधी पक्ष असणारा काँग्रेस आणि अन्य प्रादेशिक पक्षांसाठी एक कसोटीच असणार आहे.
पाच राज्यांमधील राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत काँग्रेसची सत्ता आहे. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता आहे. तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाची सत्ता आहे. तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट पक्षाची सत्ता आहे. नोहेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले. राजस्थान,मध्य प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणामध्ये २०१८ प्रमाणेच एकाच टप्प्यात मतदान होऊ शकते. तसेच त्यांनी छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. तसेच पाचही राज्यांच्या मतदानाची तारीख वेगवेगळी असू शकते.