Election Commission on Rahul Gandhi Allegations : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मत चोरीच्या आरोपांना निवडणूक आयोगाने रविवारी पत्रकार परिषद घेत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी आयोगाने राहुल गांधी यांना पुराव्यांसह प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी किंवा जाहीर माफी मागण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. तसेच जर पुरावे देण्यात आले नाहीत तर हे आरोप खोटे समजले जातील असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधी यांना सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल असे ठणकावून सांगताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की “सर्वात मोठी मतदार यादी आपल्याकडे आहे, जवळपास ९० ते १०० कोटींच्या दरम्यान….सर्वात मोठी मतदार यादी, सर्वात मोठी निवडणूक कर्मचाऱ्यांची फौज, सर्वात जास्त मतदान करणाऱ्या लोकांची संख्या आणि या सर्वांच्या समोर हे म्हणणे की, जर मतदार यादीत तुमचे नाव दुसऱ्यांदा असेल तर तुम्ही दोन वेळा मतदान केले असेल आणि कायदेशीर गुन्हा केला असेल… माझ्यासह सर्व मतदारांना आरोपी बनवलं… आणि निवडणूक आयोग शांत बसेल? शक्य नाही. प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल. तिसरा पर्याय नाही. सात दिवसांत जर प्रतिज्ञापत्र जर मिळाले नाही तर याचा अर्थ हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत आणि आमच्या मतदारांना ते बनवट आहेत असे म्हणणारा जो कोणी असेल त्याने माफी मागितली पाहिजे,” असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज दुपारी नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
मत चोरी झाल्याचा आरोप बिनबुडाचा
पत्रकार परिषदेत बोलताना, मुख्य निवडणूक आयुक्तांनी एका व्यक्तीने दोन वेळा मतदान केल्याचे आणि मत चोरी झाल्याचे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. याबरोबरच त्यांनी सर्व स्टेकहोल्डर्स पारदर्शक पद्धतीने ‘विशेष सखोल फेरतपासणी’ (SIR) यशस्वी करण्यासाठी काम करत असल्याचे देखील यावेली स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्य ही संविधानाचा अपमान असल्याचे म्हटले आहे, तसेच मत चोरी यासरखे शब्द हे लोकशाही संस्थांना कमकुवत करतात असेही निवडणुक आयुक्त म्हणाले. याबरोबरच त्यांनी राजकीय पक्ष निवडणूक आयोगाचा वापर हा मतदारांना लक्ष्य करत राजकीय फायदा मिळवण्यासाठी करत असल्याचा आरोप देखील कुमार यांनी केला.
राजकीय फायद्यासाठी वापर
“जेव्हा निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या मतदारांना लक्ष्य करत राजकारण केले जाते, अशावेळी निवडणूक आयोग प्रत्येकाला स्पष्ट करू इच्छितो की निवडणूक आयोग गरीब, श्रीमंत, वृद्ध, महिला, तरुण यासह सर्व स्तरातील, सर्व धर्माच्या सर्व मतदारांबरोबर कोणताही भेदभाव न करता एखाद्या दगडाप्रमाणे उभा राहिला आहे,” असे कुमार यांनी स्पष्ट केले.
दोन वेळा मतदान केल्याच्या दाव्यांवर कुमार म्हणाले की काही मदारांनी चिंता व्यक्त केली असली तरी कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही. “निवडणूक आयोग किंवा भारताचे मदतार अशा खोट्या आरोपांना घाबरत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.