ईव्हीएम बाबत होणाऱ्या खोट्या प्रचाराचा निवडणूक आयोगाने प्रखरतेने विरोध करावा असे वक्तव्य माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले. ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने या विधानांचा विरोध करायला हवा त्या प्रकारे त्यांचा विरोध दिसला नाही असे कुरेशी यांनी म्हटले. अमेरिकेमध्ये झालेल्या एका परिषदेमध्ये ते बोलत होते. नुकताच झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला विक्रमी मतदान मिळाले.

पंजाबचा अपवाद वगळता सर्वच राज्यांमध्ये भाजप सरकार स्थापन झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर ४०३ पैकी ३२५ जागा जिंकून एक नवा उच्चांकच भाजपने गाठला. त्यानंतर मायावती, अरविंद केजरीवाल आणि इतर काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याची टीका केली. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वापरण्यात यावा असेही काही नेत्यांनी म्हटले. ईव्हीएममध्ये कुठलाही फेरफार करणे अशक्य आहे असे निवडणूक आयोगाने म्हटले होते.

ईव्हीएममुळे आम्ही पंजाब निवडणुका हरलो असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. तुमच्या पराभवाचे खापर आमच्यावर फोडू नका असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करता येणे अशक्य आहे असे कुरेशी यांनी म्हटले. आतापर्यंत कुठेही हा प्रकार झाला नाही. ईव्हीएममध्ये घोळ करता येतो हा केवळ गैरसमज आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रचाराचा विरोध आक्रमकतेनी विरोध करावा असे कुरेशी म्हणाले. ईव्हीएममध्ये घोळ करुनच दाखवा असे आव्हान निवडणूक आयोगाने दिले आहे. वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि राजकीय पक्षांना हे आव्हान दिले आहे. मे महिन्यांमध्ये या बाबतची चाचणी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी भिंड येथे ईव्हीएमचे कुठलेही बटन दाबले असता दोन वेळा भाजपचीच पावती निघाली होती. या प्रकाराची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली होती. या प्रकरणाचा तपास केला असता ईव्हीएममध्ये फेरफार झाला नसल्याचे आयोगाने म्हटले होते.