नवी दिल्ली : मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासण्यांसाठी (‘एसआयआर’) ३० सप्टेंबरपर्यंत तयार राहा, असे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यावरून देशव्यापी ‘एसआयआर’ मोहीम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात सुरू केली जाऊ शकते, असा संकेत मिळत आहेत. परदेशी नागरिकांना मतदारयाद्यांमधून बाहेर काढणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला नवी दिल्लीमध्ये राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची (सीईओ) परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी त्यांनी पुढील १० ते १५ दिवसांमध्ये ‘एसआयआर’ सुरू करण्यासाठी तयार राहा असे सांगितले. मात्र, अधिक स्पष्टतेसाठी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली.

सीईओंना आपापल्या राज्यामधील आधीच्या ‘एसआयआर’नंतर प्रसिद्ध झालेल्या मतदारयाद्या तयार ठेवायला सांगण्यात आले आहे. बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस तर आसाम, केरल, पुड्डुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत आहेत. अनेक राज्यांच्या सीईओंनी यापूर्वीच ‘एसआयआर’ संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली आहे. दिल्ली सीईओंच्या संकेतस्थळावर २००८ची तर उत्तराखंडच्या संकेतस्थळावर २००६ची मतदारयादी दिसत आहे.

पूर्वीचे ‘एसआयआर’ आधारभूत बिहारमध्ये यापूर्वी २००३च्या ‘एसआयआर’नंतर प्रसिद्ध करण्यात आलेली मतदारयादी आता राबवलेल्या ‘एसआयआर’साठी आधारभूत मानली गेली आहे. बव्हंशी राज्यांमध्ये २००२ ते २००४दरम्यान ‘एसआयआर’ मोहीम राबवण्यात आली होती. त्यामध्ये नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांचा नव्या मतदारयादीमध्येही समावेश केला जाणार आहे. तसेच प्रस्तावित देशव्यापी ‘एसआयआर’साठी २००२ ते २००४ यादरम्यानची ‘एसआयआर’ची अखेरची तारीख मानली जाणार आहे.