नवी दिल्ली : मतदार याद्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पावले उचलण्यात आली असून आता मतदारांची ई-पडताळणी होणार आहे. आयोगाने त्यांच्या संकेतस्थळ आणि ॲपवर एक नवीन ‘ई-साइन’ फीचर सुरू केले आहे. या फीचरमध्ये मतदार म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या किंवा नाव हटवण्यासाठी आणि दुरुस्त्या करण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना त्यांच्या आधार-लिंक्ड दूरध्वनी क्रमांकाचा वापर करून त्यांची ओळख पडताळणी करणे आवश्यक आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात मतदार हटवण्याच्या अर्जाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकच्या आळंद मतदारसंघात अशा प्रकारचा गैरवापर झाल्याचा आरोप केल्यानंतर आठवडाभरात निवडणूक आयोगाने ही पावले उचलली.
पूर्वी अर्जदारांना विद्यमान मतदार छायाचित्र ओळखपत्र क्रमांकाशी दूरध्वनी क्रमांक जोडल्यानंतर आयोगाच्या ॲप आणि पोर्टलवर अर्ज दाखल करता येत होता. परंतु तपशील खरोखर त्यांचे आहेत की नाही याची पडताळणी केली जात नव्हती.
सोमवारपर्यंत उपलब्ध नसलेले ई-साइन फीचर मंगळवारी फॉर्म सबमिट करताना आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता आले. संकेतस्थळावर अर्ज क्रमांक ६ (नवीन मतदार नोंदणीसाठी), अर्ज ७ (विद्यमान यादीतील नाव समाविष्ट/काढून टाकण्यास आक्षेप घेण्यासाठी) किंवा अर्ज ८ (नोंदणी दुरुस्त करण्यासाठी) भरणाऱ्या अर्जदाराला आता ई-साइन आवश्यकता पूर्ण करावी लागेल.
अर्जदाराला त्यांच्या अर्जासाठी वापरत असलेल्या मतदार कार्डवरील त्यांचे नाव त्यांच्या आधारवरील नावासारखेच आहे आणि ते वापरत असलेला मोबाइल क्रमांकही आधारशी जोडलेला आहे याची खात्री करता येणार आहे.
राहुल गांधींनी काय आरोप केले होते?
निवडणूक आयोगाने उघड केले की कर्नाटकामील आळंदमध्ये मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी ६,००० हून अधिक अर्ज सादर करण्यात आले होते, परंतु त्यापैकी फक्त २४ अर्ज वैध आणि मंजूर असल्याचे आढळले. उर्वरित ५,९९४ अर्ज पडताळणीनंतर नाकारण्यात आले.
संशयास्पद वगळण्याच्या प्रयत्नांची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगानेच एफआयआर दाखल केला होता, असे त्यात म्हटले आहे. मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार, प्रभावित व्यक्तीला नोटीस बजावल्याशिवाय आणि त्याला बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतेही नाव यादीतून वगळले जात नाही.