बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीवरून (एसआयआर) निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नसताना, निवडणूक आयोगाने आता पश्चिम बंगालमध्येही त्यासारखा उपक्रम राबवण्याची तयारी पूर्ण केली आहे. बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस, तर पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत आहेत.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना (डीईओ) या उपक्रमासाठी भेटीच्या वेळा निश्चित करण्यासह आवश्यक तयारी वेगवान करण्याचे निर्देश दिले आहेत. बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मनोज मल्होत्रा यांनी २७ ऑगस्टला सर्व डीईओंना यासंबंधी पत्र पाठवले आहे. त्यापूर्वी मंगळवारी त्यांनी मुख्य सचिव मनोज पंत यांना पत्र पाठवून निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांच्या (ईआरओ) आणि सहाय्याक ईआरओंच्या रिक्त जागा तातडीने भरण्यास सांगितले.
या नियुक्त्यांसाठी शुक्रवारची मुदत निर्धारित करण्यात आली आहे अशी माहिती राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने दिली आहे. मनोज अग्रवाल शुक्रवारी प्रस्तावित उपक्रमासंबंधी सर्व राजकीय पक्षांबरोबर बैठक घेणार आहेत. मात्र, त्याला ‘एसआयआर’ म्हटले जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
दरम्यान, आपण जिवंत असेपर्यंत कोणाचाही मताधिकार हिरावून घेतला दिला जाणार नाही असा इशारा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी दिला. भाजपने देशभरातील बंगाली भाषकांविरोधात भाषिक दहशतवाद पसरवला आहे या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.