|| संतोष प्रधान
‘मुंबईकरांना हवेचा अंदाज बरोबर येतो’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारच्या जाहीर सभेत व्यक्त केलेली प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. कारण गेल्या काही वर्षांत लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांनी एखाद-दुसरा अपवाद वगळल्यास एकाच पक्षाला किंवा मित्र पक्षांच्या बाजूने कौल दिला आहे. विशेष म्हणजे अनेकदा हा कल केंद्रात सत्ता मिळणाऱ्या राजकीय पक्षांच्या बाजूने होता. हाच कल यंदाही कायम राहणार की संमिश्र यश मिळणार याची उत्सुकता असेल.
मुंबईतील सहा जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. मतदानाचा टक्का कसा असेल, याची राजकीय पक्षांमध्ये चिंता आहे. कारण सुट्टय़ांचा हंगाम असल्याने मुंबईतून उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ा भरभरून जात आहेत. मुंबईत सरासरी मतदान कमी होते. गेल्या वेळी ५३ टक्क्य़ांच्या आसपास मतदान झाले होते.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांच्या निकालांचा आढावा घेतल्यास बहुसंख्य वेळेला मुंबईकरांनी एकाच राजकीय पक्षाला किंवा मित्र पक्षांच्या बाजूने कौल दिला आहे. सुरुवातीच्या काळात मुंबईत काँग्रेसचे वर्चस्व होते. १९७७ च्या जनता लाटेत मुंबईकरांनी जनता पक्ष किंवा तेव्हा भारतीय लोकदलाच्या नावाने लढलेल्या उमेदवारांच्या बाजूने कौल दिला होता. १९८० मध्ये देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली, पण मुंबईकरांनी जनता पार्टीलाच कौल दिला होता. १९९८ मध्ये संमिश्र यश मिळाले होते. १९९९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित झाली होती. तेव्हा मुंबईतून विधानसभेत काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले होते, पण लोकसभेत शिवसेना-भाजप युतीने पाच जागा पटकाविल्या होत्या.
१९७७, १९८४, १९९१, १९९६, १९९९, २००४, २००९, २०१४ मध्ये मुंबईकरांनी कौल दिलेला पक्ष केंद्रात सत्तेत आला होता. यातून मुंबईकरांना हवेचा अंदाज बरोबर येतो ही मोदी यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया बोलकी आहे.
सर्व जागा जिंकण्यावर युती आशावादी
गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत मुंबईतील सहाही मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेना युतीचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले होते. यंदाही सर्व सहाही जागा जिंकू, असा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला आहे. तर या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा मुंबईवर वरचष्मा असेल, असा दावा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. या वेळी सहाही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. उत्तर मुंबईत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांना निवडणूक सोपी जाईल, असे चिन्ह होते, पण उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीने चुरस निर्माण झाली. उत्तर पश्चिममध्ये संजय निरुपम यांनी शिवसेनेच्या गजानान कीर्तिकर यांच्या समोर आव्हान उभे केले. पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांची उत्तर मध्यमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे आणि एकनाथ गायकवाड यांच्यात लढत होत आहे. दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा आणि शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यात रंगतदार लढत होणार आहे.
मुंबईतील सहा जागांवरील निकालांचा आढावा
- १९७७ – भारतीय लोकदल ५, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – १
- १९८० – जनता पार्टी – ५, काँग्रेस – १
- १९८४ – काँग्रेस – ५ , अपक्ष – १
- १९८९ – सेना-भाजप युती – ४, काँग्रेस – २
- १९९१ – काँग्रेस – ४, युती – २
- १९९६ – शिवसेना-भाजप युती – ६
- १९९८ – काँग्रेस-रिपब्लिकन – ३, युती – ३
- १९९९ – शिवसेना-भाजप – ५, काँग्रेस – १
- २००४ – काँग्रेस – ५, शिवसेना – १
- २००९ – काँग्रेस-राष्ट्रवादी – ६
- २०१४ – भाजप-शिवसेना युती – ६