केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला काही निर्दयी लोकांनी फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची अमानुष घटना उघडकीस आली आहे. हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्‍या पिलासह तिचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी आता भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळमध्ये एका गावात हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मेनका गांधींनी केरळमधील वायनाडमधून कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना निशाण्यावर घेतले. “वन विभागाच्या सचिवांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण खात्याच्या मंत्र्यांना थोडीजरी समज असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा”, असे मेनका गांधी म्हणाल्या. वृ्त्तसंस्था एएनआयशी पुढे बोलताना, ‘कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्याच भागातील आहेत, त्यांनी अद्याप कारवाई का केली नाही?’ असा प्रश्नही मनेका गांधी यांनी विचारला.

दरम्यान, केंद्र सरकारनेही आता या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. “केरळमध्ये हत्तीणीच्या झालेल्या हत्येची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची कसून चौकशी करुन दोषींना ताब्यात घेतलं जाईल व कठोर कारवाई केली जाईल. फटाके खायला देऊन हत्या करणं ही भारताची संस्कृती नाही”, असे केंद्रीय वनमंत्री तथा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा- केरळमध्ये अजून एका हत्तीणीची त्याच क्रुरतेने हत्या झाल्याचा संशय

दुसरीकडे, केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे. तर, प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ह्यूमन सोसायटी इंटनॅशनल/इंडियाने (HSI) या घटनेसाठी दोषी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 50 हजार रुपये बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय हत्तीणीच्या मृत्यूसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी प्रसारमाध्यमांनी बोलताना दिली. वन-विभागानेही मारेकऱ्यांचा शोध सुरु केला असून दोषी व्यक्तींना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. तर, केरळमध्ये स्थानिक शेतकरी रानडुकरांपासून शेताचं संरक्षण व्हावं यासाठी फटाक्यांनी भरलेल्या अननसाचा वापर करतात. हत्तीण अन्नाच्या शोधात जंगल सोडून जवळील गावात शिरली होती. याचदरम्यान हत्तीणीने हे फळ खाल्लं असावं अशी शक्यताही वन-अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा- फटाके खायला देऊन हत्या करणं ही भारताची संस्कृती नाही, हत्तीणीच्या हत्येची केंद्राकडून गंभीर दखल

एका गावात फटाक्यांनी भरलेलं अननस गर्भवती हत्तीणीला खायला देण्यात आलं. ते खाल्ल्यानंतर, अननस पोटात फुटल्यामुळे या हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले. केरळमधील वन-विभागात काम करणारे अधिकारी मोहन क्रिश्नन यांच्या फेसबुक पोस्टमुळे ही घटना प्रसारमाध्यमांसमोर आली. “हे फळ खाल्ल्यानंतर ते तिच्या पोटात फुटलं. हा धमाका इतका मोठा होता की हत्तीणीची जीभ आणि तोंडाला चांगलीच दुखापत झाली होती. या वेदना आणि भूक सहन होत नसल्यामुळे हत्तीण गावात सैरावैरा पळत होती. या वेदनेमुळे तिला काहीही खाता येत नव्हतं. अशाही परिस्थितीत तिने एकाही व्यक्तीला इजा पोहचवली नाही. एकही घर तिने तुडवलं नाही. मला तरी ती एखाद्या देवीप्रमाणेच वाटली.” मोहन क्रिश्नन यांनी मल्याळम भाषेत हा घटनाक्रम आपल्या फेसबूक अकाऊंटवर मांडला आहे. स्थानिक लोकांनी तिला हे फळ खायला दिलं असेल असा अंदाज मोहन क्रिश्नन यांनी व्यक्त केला आहे. फळाचा स्फोट झाल्यानंतर, काही वेळाने ही हत्तीण वेलियार नदीच्या किनारी पोहचली आणि ती पाण्यात जाऊन उभी राहिली. मोहन क्रिश्नन यांच्या मते आपल्या जखमेवर माशा किंवा इतर किटक बसू नयेत यासाठी हत्तीणीने आपली सोंड पाण्यात बुडवली होती. या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी स्थानिक वन अधिकाऱ्यांनी दोन Rapid Response Team मागवल्या होत्या. मोहन याच टीमचे सदस्य होते. या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी इतर दोन हत्तींना घटनास्थळावर आणलं, पण तरीही या हत्तीणीने बाहेर न येणं पसंत केलं. वन अधिकाऱ्यांनी हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले परंतू अखेरीस दुपारी ४ वाजल्याच्या दरम्यान हत्तीणीने आपले प्राण सोडले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elephant death in kerala maneka gandhi targets rahul for no action sas
First published on: 04-06-2020 at 11:02 IST