Elon Musk on Suchir Balaji Death : टेस्ला आणि एक्सआयसारख्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांनी ओपनएआयचे दिवंगत कर्मचारी सुचिर बालाजी यांच्या मृत्यूबाबत मोठा दावा केला आहे. मस्क यांनी म्हटलं आहे की “सुचिर बालाजी यांनी आत्महत्या केली नव्हती, त्यांची हत्या झाली होती.” ओपनएआयचे प्रमुख सॅम ऑल्टमॅन यांनी अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट टकर कार्लसन यांना नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सुचिर बालाजी यांच्या मृत्यू प्रकरणावर दोघांनीही भाष्य केल्यामुळे बालाजी यांचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

दरम्यान, सुचिर बालाजी यांच्याबद्दल एका एक्स युजरने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना एलॉन मस्क म्हणाले, “सुचिरने आत्महत्या केली असेल असं वाटत नाही. ही हत्या असावी.” मस्क यांच्या या वक्तव्यामुळे समाजमाध्यमांवर तर्कवितर्कांना उत आला आहे.

कार्लसन हे अमेरिकन पुराणमतवादी (कन्झरव्हेटिव्ह) राजकीय लेखक आहेत. ते म्हणाले, “ओपनएआयचे माजी कर्मचारी सुचिर बालाजी यांचा खून झाला होता का? कारण त्यांच्या आईने दावा केला आहे की ऑल्टमनच्या आदेशांनंतर बालाजी यांचा खून करण्यात आला आहे.”

मस्क व ऑल्टमन यांच्यात संघर्ष

दुसऱ्या बाजूला एलॉन मस्क व सॅम ऑल्टमन यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. दोघेही व्यावसायिक प्रतिस्पर्धी आहेत. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात दोघे आपापल्या एआय प्लॅटफॉर्म्ससह एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अलीकडेच मस्क म्हणाले होते की “ओपनएआय हे एक यशस्वी व्यासपीठ नाही.”

मस्क यांची ओपनएआयवर टीका

ऑल्टमन म्हणाले, “मस्क यांनी आमची कंपनी स्थापन करताना मदत केली होती. मात्र, त्यांनी अल्पावधित कंपनी सोडली. कारण त्यांना वाटत होतं की ही कंपनी यशस्वी होणार नाही. मात्र, आता ओपनएआय ची प्रगती बघून ते निराश झाले आहेत. मी त्यांची निराशा समजू शकतो.”

ओपनएआयसमोर ग्रोकचं आव्हान

मस्क हे चॅटजीपीटीची निर्माती कंपनी ओपनएायची स्थापना करणाऱ्यांपैकी एक होते. ते ओपनएआयच्या संचालक मंडळावर देखील होती. परंतु, कंपनीचं काम पाहून ऑल्टमन व मस्क यांच्यात खटके उडाले. त्यांनंतर मस्क ओपनएआयमधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःची एक्सएआय कंपनी स्थापन केली. मस्क यांनी चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी ग्रोक हे एआयआधारित चॅटबॉट विकसित केलं आहे.