दिल्लीतील बिजवासन येथील बेनामी संपत्तीप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालप्रसाद यादव यांची मोठी मुलगी व राज्यसभा सदस्य मिसा भारतीसमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ८ हजार कोटी रूपयांच्या या प्रकरणात भारती यांचे सनदी लेखापाल (सीए) राजेश अग्रवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) अटक केली आहे.
Enforcement Directorate arrested Misa Bharti's chartered accountant Rajesh Agarwal in money trail scam. ED to produce him in Delhi Court
— ANI (@ANI) May 23, 2017
इडीने राजेश अग्रवालला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयासमोर उभे केले. त्यांचे राजकीय पक्षांबरोबर संबंध असल्याचा संशय आहे. सोमवारी प्राप्तिकर विभागाने दिल्ली आणि गुरूग्राम येथे लालूप्रसाद यादव यांच्याशी निगडीत विविध ठिकाणे आणि कंपन्या अशा सुमारे २२ ठिकाणी छापे मारले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे छापे १ हजार कोटी रूपयांच्या बेनामी संपत्तीच्या व्यवहाराच्या आरोपावरून मारण्यात आले होते. गत १५ वर्षांत डझनहून अधिक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रूपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लालूप्रसाद यादव यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नेत्यांना आव्हान दिले. भाजप आणि संघाच्या नेत्यांनो मी तुम्हाला दिल्लीतील खुर्चीवरून खाली खेचेन, यासाठी भले मला माझी स्थिती काहीही होवो. याद राखा, मला घाबरवण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावले होते. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ माझा बदला घेत आहेत. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशी सरळसरळ धमकीच त्यांनी दिली होती. ते माझ्या पक्षाची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप त्यांनी या वेळी केला होता.
नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, मोदी सरकारचे जर हेच धोरण राहिले तर ५ वर्षेही हे सरकार टिकणार नाही. येत्या २७ ऑगस्ट रोजी पाटणा येथील गांधी मैदानावर एका विशाल मोर्चाचे आयोजन केले जाणार असून यात समान विचारणसरणीचे सर्व नेते उपस्थितीत असतील आणि ते आपली पुढील रणनिती निश्चित करतील, अशी माहिती त्यांनी दिली होती.