पीटीआय, बंगळुरू

पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणि कर्नाटकातील पर्यावरणवादी कार्यकर्त्या सालूमरदा थिमक्का यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या ११४ वर्षांच्या होत्या. थिमक्का यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती कुटुंबातील सूत्रांनी दिली.

थिमक्का यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

थिमक्का यांचा जन्म तुमकुर जिल्ह्यातील एका खेड्डयामध्ये ३० जून १९३१ रोजी झाला. त्यांचे औपचारिक शिक्षण झाले नव्हते. त्यांना स्वतःला मूलबाळ नव्हते. आयुष्यातील ही पोकळी भरून काढण्यासाठी त्या वृक्षलागवडीकडे वळाल्या. बंगळुरू दक्षिण जिल्ह्यामधील हुळीकल ते कुडुर या साडेचार किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये त्यांनी ३८५ वडाची झाडे लावली आणि त्यांच्या वाढीकडे लक्ष दिले. त्यावरूनच त्यांच्या नावाला सालूमरदा ही उपाधी लागली. सालूमरदा म्हणजे झाडांची रांग. याशिवाय त्यांनी अन्य हजारो झाडे लावली होती. त्यामध्ये वडाबरोबरच पिंपळ आणि औदुंबर या झाडांचा समावेश आहे. या कामामध्ये त्यांना त्यांचे पती चिक्कय्या यांचीही भक्कम साथ मिळाली होती.

विविध पुरस्कारांनी गौरव

पर्यावरणासाठी केलेल्या भरीव कामासाठी थिमक्का यांना २०१९मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. पद्मश्रीसह त्यांना एकूण १२ पुरस्कार मिळाले. त्यामध्ये २०१०चा हम्पी विद्यापीठातर्फे दिला जाणारा ‘नादोजा पुरस्कार’, १९९५चा ‘राष्ट्रीय नागरिक पुरस्कार’ आणि १९९७चा ‘इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार’ या प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे. ‘बीबीसी’च्या २०१६च्या जगभरातील १०० प्रभावी स्त्रियांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस आणि ओकलँड येथे त्यांच्या नावाने ‘थिमक्का रिसोर्सेस फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन’ ही संस्था कार्यरत आहे.

सालूमरदा थिमक्का यांनी हजारो झाडे लावली आणि स्वतःच्या मुलांसारखे त्यांचे संगोपन केले. त्यांनी स्वतःचे आयुष्य पर्यावरणाच्या संवर्धानाला वाहून घेतले होते. त्यांच्या पर्यावरणप्रेमामुळे त्या अमर झाल्या आहेत.- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक