चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं आहे. करोनामुळे त्यांच्यावर एम्स ऋषिकेशमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पर्यावरण आंदोलनं आणि संघटनांचं मोठं नुकसान झालं आहे.

८ मे २०२१ रोजी त्यांना करोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एम्स ऋषिकेशमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पर्यावरणवादी सुंदरलाल यांना करोनासोबत निमोनियाही झाला होता. त्यात त्यांना मधुमेह असल्याने उपचारादरम्यान अनेक अडचणी येत होत्या. तसेच त्यांची ऑक्सिजन लेव्हल ८६ वर आली होती. यासाठी रुग्णालयातील डॉक्टर मधुमेह आणि ऑक्सिजन लेव्हल संतुलित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

पर्यावरणवादी पद्मभूषण आणि स्वातंत्र्यसैनिक सुंदरलाल यांचा जन्म जानेवारी १९२७ला टिहरी जिल्ह्यातील मरोडा गावात झाला होता. त्यांचे वडील अंबादत्त बहुगुणा टिहरीत वनाधिकारी होते. सुंदरलाल हे १३ वर्षांचे असताना शहीद श्रीदेव सुमन यांच्या संपर्कात आले आणि तिथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

Covid 19: अन् कार्यक्रमात बोलता बोलता मोदींना अश्रू झाले अनावर; पहा व्हिडीओ

पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी १९७३ साली चिपको आंदोलनाला सुरुवात केली होती. गडवाल हिमालयात वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाचा मोर्चा त्यांनी सांभाळला होता. गौरा देवी आणि अन्य साथीदारांसह त्यांनी चिपको आंदोलन सुरु केलं. २६ मार्च १९७४ साली चमोली जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिला झाडांना मिठी मारून उभ्या राहिल्या. त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण देशभर गाजलं.