वृत्तसंस्था, पॅरिस
अमेरिकेने व्यापार भागीदारी देशांकडून आयात केल्या जाणाऱ्या पोलाद आणि अॅल्युमिनियमवरील कर २५ टक्क्यांवरून दुपटीने वाढवून थेट ५० टक्के करण्याची घोषणा बुधवारी केली. जुलैमध्ये आणखी दंडात्मक आयातशुल्क टाळायचे असेल तर व्यापारी भागीदार देशांनी सर्वोत्तम प्रस्ताव द्यावेत असेही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने सुचवले आहे. अमेरिकेच्या निर्णयामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, अमेरिकेने लादलेले आयातशुल्क मागे घ्यावे यासाठी युरोपमधील व्यवसायांनी युरोपीय महासंघाकडे (ईयू) विनंती केली आहे. या मुद्द्यावर अमेरिका आणि ‘ईयू’च्या प्रतिनिधींची पॅरिस येथे चर्चा झाली. महासंघाचे व्यापारसंबंधी वाटाघाटी करणारे अधिकारी मारोस सेफकोविक आणि अमेरिकेचे अधिकारी जेमिसन ग्रीर यांनी चर्चेत सहभाग घेतला.‘‘ही चर्चा रचनात्मक आणि सकारात्मक झाली. आम्ही योग्य दिशेने जात आहोत,’’ असे सेफकोविक यांनी सांगितले.

अमेरिकेचा आयातशुल्कवाढीचा निर्णय ब्रिटन वगळता अन्य सर्व देशांना लागू होणार आहे. ब्रिटन आणि अमेरिकेदरम्यान प्राथमिक व्यापार करार झाला आहे. त्यामुळे ब्रिटनकडून केल्या जाणाऱ्या पोलाद व अॅल्युमिनियमवर ९ जुलैपर्यंत तरी २५ टक्केच कर असेल.

आम्ही २५ टक्के आयातशुल्क लागू केले होते. यासंबंधीच्या डेटाचा अधिक अभ्यास केल्यावर आमच्या लक्षात आले की याचा फायदा होत आहे, पण आम्हाला अधिक फायदा हवा आहे. त्यामुळे आम्ही बुधवारपासून ५० टक्के आयातशुल्क लागू करत आहोत.

केविन हॅसेट, व्हाइट हाऊसचे आर्थिक सल्लागार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘व्हॅट’वर युरोप ठाम

युरोपीय देशांमध्ये अमेरिकी उत्पादनांवर लावलेले मूल्यवर्धित कर (व्हॅट) हा अन्याय्य संरक्षणवाद असल्याचे ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांचे म्हणणे आहे. मात्र, ‘व्हॅट’ हे युरोपीय महासंघाद्वारे नाही तर राष्ट्रीय पातळीवर लागू केले जातात. तसेच ते देशांतर्गत उत्पादित आणि आयात उत्पादनांवर समान आहेत. त्याकडे व्यापारातील अडथळा म्हणून पाहता येत नाही, त्यामुळे ट्रम्प यांना खुश करण्यासाठी युरोपीय देशांची सरकारे आपापली करप्रणाली पूर्णपणे बदलण्याची शक्यता नाही असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्याबरोबरच अन्न व सुरक्षा नियम रद्द करण्याची अमेरिकेची मागणी युरोपकडून मान्य होण्याची शक्यता नाही.