निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड झाल्याचे सर्व आरोप फेटाळले असून सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरुन निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम मशीन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असल्याचे व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मतदान झाल्यानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स उमेदवारांसमोर योग्य पद्धतीने सील करण्यात आल्या होत्या. यावेळी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेरेही होते. सीपीएफ सुरक्षा जवानदेखील उपस्थित होते. सर्व आरोप निराधार आहेत’, असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास अद्याप वेळ असताना ट्विटरवर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. या व्हिडीओंमध्ये ईव्हीएम मशीन्स अनधिकृत ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचं दिसत आहे. यापैकी काही मशीन्स स्थानिक दुकानात, तर काही खासगी गाडीत असल्याचं दिसत आहे.

असाच एक उत्तर प्रदेशातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काहीजण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स गाडीतून बाहेर काढून एका दुकानाच्या आतमध्ये नेत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील चंदौली येथील हा व्हिडीओ आहे. अजून एक व्हिडीओ आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स एका कारमध्ये असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पंजाबमधील आहे. आपच्या महिला कार्यकर्त्याने यावरुन भाजपाला टार्गेट केलं आहे.

यादरम्यान, महाआघाडीचे उमेदवार अफजल अन्सारी जे बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत त्यांनी ईव्हीएमची अदलाबदली केली जात असल्याचा आरोप केला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरुन संशय व्यक्त केला आहे. ईव्हीएमसोबत छेडछाड करणं फोन टॅप करण्याइतकं सोपं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनीदेखील खासगी वाहनांमध्ये ईव्हीएम का सापडत आहेत ? असा सवाल विचारला असून सपाकडूनही छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evm machines are safe and secure says election commission
First published on: 21-05-2019 at 13:16 IST