ex-Bajrang Dal member Suhas Shetty hacked to death in Mangaluru : कर्नाटकच्या मंगळुरू येथे सुहास शेट्टी नावाच्या एका माजी बजरंग दल सदस्यावर गुरूवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या शेट्टीचा नंतर खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या शेट्टीवर मंगळुरू शहराला लागून असलेल्या एका गावात हा हल्ला झाला. या प्राणघातक हल्ल्याचा व्हिडीओ देखील कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री ८.२७ वाजता शेट्टी हा पाच जणांसह कारमधून जात असताना त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्या गाडीला इतर दोन गाड्यांनी अडवण्यात आले. त्यानंतर दोन गाड्यांमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी शेट्टीवर तलवार आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला. यानंतर शेट्टी याला जवळच्या एजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रुग्णालयाला आमदार, खासदारांकडून भेट

दरम्यान शेट्टी याच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात हिंदू कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. यादरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले होते. यावेळी भाजपा खासदार नलिन कुमार कतील, आमदार भारत शेट्टी आणि इतर वेगवेगळ्या हिंदू संघटनांच्या नेत्यांनी रुग्णालयाला भेट दिली.

“एका हिंदू कार्यकर्त्याची आज हत्या झाली. हे राज्य आता हिंदूंसाठी सुरक्षित राहिलेले नाही. पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी. असामाजिक घटाकांना प्रोत्साहन दिले जात आहे, ज्यामुळे अशा घटना घडत आहेत. ही ठरवून केलेली हत्या आहे. कारमधील दुसरा व्यक्तीदेखील जखमी झाला आहे,” असे आमदार भारत शेट्टी म्हणाले.

दरम्यान या हत्येनंतर विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक शाकेने शुक्रवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत मंगळुरू बंदची हाक दिली आहे. यादरम्यान रुग्णालयाच्या परिसरातील तसेच इतर संवेदनशील परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

कर्नाचकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी सरकार या घटनेची तात्काळ दखल घेतली असल्याचे म्हटले आहे. “चार पथके तयार करण्यात आली आहेत. मी एका वरिष्ठ एडीजीपी- स्तरावरील अधिकार्‍याला पाठवले आहे, जेणेकरून शांतता राखली जाईल आणि अतिरिक्त फोर्स देखील तैनात करण्यात आली आहे. आम्ही ही घटना खूप गांभीर्याने घेतली आहे आणि आम्ही याची चौकशी करत आहोत. आम्हाला मंगळुरूमध्ये शांतता हवी आहे,” असेही ते म्हणाले.

कारण काय असू शकतं?

दरम्यान मंगळुरूचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी या घटनेमागील कारण निश्चित करणे घाईचे होईल असे म्हटले आहे. “बदला घेण्यासाठी ही हत्या झाली का याबद्दल अद्याप आम्हाला कोणतीही माहिती नाही. तपासात अधिक माहिती समोर येईल. व्हिडीओच्या मदतीने आम्ही काही आरोपींची ओळख पटवली आहे,” असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२२ मध्ये सुरथकल येथे कपड्यांच्या दुकानाजवळ मोहम्मद फाझिल या २३ वर्षीय मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आली होती, या हत्या प्रकरणात सुहास शेट्टी हा प्रमुख आरोपी होता. फाझिलच्या हत्येपूर्वी दोन दिवस आधी भाजपा युवा मोर्चाचा सदस्य प्रवीण नेट्टारू याची हत्या झाली होती. याचा बदला घेण्यासाठी फैजलची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जाते.