माजी भाजप आमदार कानु कालसरिया यांनी  आपल्या समर्थकांसह बुधवारी आम आदमी पक्षात प्रवेश केल्याची घोषणा केली. आपल्या मतदार संघात निरमाच्या सिमेंट प्रकल्पाविरोधात कालसरिया यांनी तीव्र आंदोलन छेडले होते. दिल्लीत पक्षाने दमदार कामगिरी केल्यामुळे चांगल्या लोकांचा ओढा ‘आप’कडे वाढल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
२०१२ मध्ये गरियाधर विधानसभा मतदारसंघातून कालसरिया यांनी सद्भावना मंचच्या झेंडय़ाखाली निवडणूक लढवली होती.२०१४ च्या निवडणुकीत तिसरा पर्याय म्हणून लोकांचा पक्ष असलेला ‘आप’ पुढे आला आहे. त्यामुळे  याच पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याचे कालसरिया यांनी स्पष्ट केले. ‘आप’चे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य दिनेश वाघेला यांच्या उपस्थितीत कालसरिया यांनी आपल्या समर्थकांसह पक्षप्रवेश केला.
 लोकसभा निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींविरोधात मैदानात उतरणार का, पक्षाचा जो निर्णय असेल तो मान्य राहील असेही कालसरिया यांनी स्पष्ट केले. इन्फोसेस या  संगणक क्षेत्रातील जगविख्यात कंपनीचे माजी संचालक व्ही बालकृष्णन यांनीही ‘आप’मध्ये सामील होत असल्याची घोषणा केली आहे.