संयुक्त राष्ट्रे : गाझा पट्टीत इस्रायलच्या हल्ल्यात सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात ‘संरक्षण समन्वय अधिकारी’ म्हणून काम करणारे कर्नल वैभव अनिल काळे या माजी भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी गाझा युद्धाला तोंड फुटल्यापासून गेलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय बळी असल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंतोनिओ गुटेरेस यांनी या हल्ल्याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, इस्रायलनेही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

कर्नल वैभव काळे (४६) हे मूळचे नागपूरचे होते. भारतीय लष्करातून सन २०२२मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांनी ‘११ जम्मू-काश्मीर रायफल्स’मधून विविध आघाड्यांवर बजावली होती. दोनच महिन्यांपूर्वी ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात रुजू झाले होते.

हेही वाचा >>> DHFL Scam : ३४ हजार कोटी रुपयांच्या बॅंक फसवणूक प्रकरणी धीरज वाधवान यांना सीबीआयकडून अटक

कर्नल काळे सोमवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह संयुक्त राष्ट्रांच्या वाहनाने राफा येथील युरोपीय इस्पितळाकडे जात असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले.

काळे यांच्या मृत्यूबद्दल संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस यांनी तीव्र शोक व्यक्त करण्याबरोबरच या हल्ल्याच्या संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे, असे त्यांच्या कार्यालयाच्या उपप्रवक्त्या फराह हक् यांनी सांगितले.

शस्त्रबंदीचे आवाहन

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण अधिकाऱ्याच्या मृत्यूच्या वृत्ताने आपल्याला धक्का बसला आहे. गाझा संघर्षातील मृतांचा आकडा वाढतच आहे. त्यात केवळ नागरिकच नव्हे तर मानवीय दृष्टिकोनातून काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे तातडीने शस्त्रबंदी लागू करण्याबरोबरच ओलिसांचीही मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंतोनिओ गुटेरेस यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नल काळे एप्रिल २००४मध्ये भारतीय लष्करी सेवेत दाखल झाले होते. त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सन २००९ ते २०१० दरम्यान सेवा बजावली होती. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली होती. त्यानंतर त्यांनी वर्तनशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याची पदवी मिळवली.