करोना लसीकरण केल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असल्याने पंजाबमधील एका व्यक्तीने लस घेण्यास नकार दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो जबरदस्तीने या प्रमाणपत्रावर लावण्यात आल्याचा आरोप या व्यक्तीने केलाय. यासंदर्भात या व्यक्तीने राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्रही लिहिलं आहे. यापूर्वी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान करोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असण्यावरुन वाद निर्माण झाला होता. आता पंजाबमधील एका प्राध्यापकाने लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढा नाहीतर करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्यू दाखल्यांवरही मोदींचा फोटो छापा अशी मागणी केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून निवृत्त झालेल्या प्राध्यापक चमनलाल यांनी मोदींच्या फोटोमुळे लस टोचून घेण्यास नकार दिलाय. मोदींचा फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर असल्याने आपण लस घेतली नाहीय असं चमनलाल सांगतात. करोनाची लस घेतलेल्या प्रमाणपत्रावर एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणं अपेक्षित आहे, असंही चमनलाल म्हणालेत. ७४ वर्षीय चमनलाल यांनी आपण लसीकरणास पात्र असून पंजाबमधील वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण करणं गरजेचं असल्याचं मान्य केलं असलं तरी या ‘खासगी आणि सामाजिक विरोधामुळे’ लस घेत नसल्याचं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “करोना काळात देशातील शांतता, स्थैर्याऐवजी अमित शाहांनी महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याला प्राधान्य दिलं”

इतर देशांमधील करोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर राजकीय नेत्यांचे फोटो छापलेले नाहीत, असंही चमनलाल सांगतात. भारतामध्ये लसीकरण करण्यात आलेल्या लोकांना सत्तेत असलेल्या नेत्याच्या फोटोसहीत प्रमाणपत्र दिलं जात आहे, याबद्दल चमनलाल यांनी नाराजी व्यक्त केलीय. करोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंसाठी सत्ताधारी पक्षच जबाबदार असल्याचा आरोप चमनलाल यांनी केलाय. पंजाब सरकारने करोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवावा अशी मागणी चमनलाल यांनी केलीय.

मागील सात वर्षांपासून मोदी सत्तेत आहेत. ते प्रत्येक जागी स्वत:ची जाहिरात करताना दिसतात. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांच्या फोटोची काय गरज आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो लावला जात असेल तर करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूच्या दाखल्यांवरही मोदींचा फोटो लावण्यात यावा असंही चमनलाल यांनी आजतकशी बोलताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >>“सर्व चांगल्या गोष्टींचं श्रेय स्वत: घ्यायचं अन् वाईटासाठी राज्य सरकारांना दोषी ठरवायचं, अशी मोदींची वृत्ती”

अशाप्रकारे करोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरुन वाद होण्याची ही काही पहिली घटना नाहीय. यापूर्वी महाराष्ट्रातील सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांनी मोदींच्या या फोटोसंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex jun professor refuse vaccination as pm modi photo is printed on vaccination certificate scsg
First published on: 29-04-2021 at 13:27 IST