Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जगातील अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी भारतावरही २५ टक्के टॅरिफ लादलं, तसेच ६ ऑगस्ट रोजी भारतावर आणखी २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं. भारतावरील अतिरिक्त टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू झालं असून आता अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्के झालं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे (आयात शुल्क) भारताला अमेरिकेत वस्तू निर्यात करण्यासाठी ५० टक्के टॅरिफ भरावा लागत आहे. याचा भारतातील अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. टॅरिफच्या मुद्यावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला आहे. मात्र, असं असतानाच दुसरीकडे भारत आणि चीनमधील संबंध सुधारत असल्याची परिस्थिती दिसत आहे.

तब्बल सात वर्षांनंतर पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार असून ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अतिरिक्त टॅरिफ दरम्यान भारतासाठी चीनचा हा दौरा महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी भाष्य करत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली. चीनची विश्वासार्हता वाढत आहे आणि आपला अमेरिकन ब्रँड टॉयलेटमध्ये दिसत आहे, असं जेक सुलिव्हन यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

जेक सुलिव्हन काय म्हणाले?

अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारताबाबतच्या व्यापार धोरणावर तीव्र हल्ला चढवला. जेक सुलिव्हन यांनी असा इशारा दिला की वाढत्या शुल्कामुळे अमेरिकेची जागतिक स्थिती बिघडत आहे व भारत आणि चीन जवळ येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून वॉशिंग्टनने द्विपक्षीय आधारावर भारताशी संबंध मजबूत करण्यासाठी काम केलं. परंतु ट्रम्प यांच्या शुल्काबाबतच्या धोरणामुळे संबंध ताणले गेले आहेत. ज्यामुळे भारत-चीन जवळ येत आहेत, असं जेक सुलिव्हन यांनी म्हटलं.

“ट्रम्प यांच्या शुल्काबाबतच्या धोरणाच्या परिणामामुळे वर्षानुवर्षे अमेरिकेच्या हितसंबंधांना हानी पोहोचू शकते. हा असा देश आहे ज्याच्याशी आपण अधिक शाश्वत संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याऐवजी या शुल्कांमुळे भारताला आता चीनशी जवळून संबंध निर्माण करण्यास भाग पाडले जात आहे. नवी दिल्लीला बीजिंगची बाजू घेण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे चीनची विश्वासार्हता वाढत आहे आणि आपला अमेरिकन ब्रँड टॉयलेटमध्ये दिसत आहे”, अशा शब्दांत जेक सुलिव्हन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर टीका केली.