एक्स्प्रेस वृत्त, नवी दिल्ली
अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महिलांना वगळण्याचा मुद्दा तांत्रिक बाब असल्याचे म्हटले आहे. या मुद्द्यावरून टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी संवाद साधण्यासाठी महिला पत्रकारांना रविवारी विशेष आमंत्रण दिले. या पत्रकार परिषदेला अनेक महिला पत्रकार उपस्थित होत्या.
मुत्ताकी सध्या भारताच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या शुक्रवारच्या पत्रकार परिषदेमध्ये महिलांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे केंद्र सरकारसह मुत्ताकी यांच्यावर टीका झाली होती. मात्र, ही पत्रकार परिषद आयोजित करण्यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाचा कुठलाही सहभाग नव्हता, असे सांगून परराष्ट्र मंत्रालयाने या वादापासून स्वतःला दूर ठेवले.
‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन वूमेन प्रेस कोअर’ यांनी मुत्ताकी यांच्या या कृतीवर आक्षेप घेतला. ‘राजनैतिक विशेष हक्काचा वापर भारतीय भूमीवर लिंगभेदासाठी करता कामा नये,’ अशी टीका ‘एडिटर्स गिल्ड’ने केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा यांनी केंद्रावर यावरून टीका केली होती.
मुत्ताकी यांचा आग्रा दौरा रद्द
आग्रा : मुत्ताकी यांचा रविवारी नियोजित आग्रा दौरा रद्द करण्यात आला आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. हा दौरा रद्द करण्यामागील कारण मात्र अधिकाऱ्यांनी सांगितलेले नाही. या दौऱ्यात मुत्ताकी हे ताज महालला भेट देणार होते. मुत्ताकी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथील दारूल उलूम देवबंद येथे भेट दिली.