भारताविरुद्ध पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झालेल्या शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झासह एका क्लबमध्ये मेजवानी करतानाची चित्रफीत सोमवारी समाजमाध्यमांवर पसरल्यामुळे चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या चित्रफीतीत शोएब, सानिया यांच्याव्यतिरिक्त पाकिस्तानी संघातील इमाम उल हकसुद्धा मँचेस्टर येथील शीशा कॅफेत दिसत आहे.

परंतु मलिकने ही चित्रफीत सामन्यापूर्वीची नसल्याचे म्हटले आहे. ‘‘समाजमाध्यमांवर पसरत असलेली ही चित्रफीत १५ जूनची नसून, १३ जूनची आहे. त्यामुळे माध्यमांनी कृपया माझ्या कुटुंबीयांना या प्रकरणात ओढू नये,’’ असे मलिक म्हणाला. तर सानियाने म्हटले की, ‘‘आमच्या परवानगीशिवाय चित्रीकरण करण्यात आले. मुख्य म्हणजे आमच्यासोबत लहान मूल असतानाही ही चित्रफीत बनवणाऱ्याला लाज वाटली नाही. त्यामुळे किमान पुढील वेळेस आपण काय पोस्ट करत आहोत, याचे भान राखावे.’’