सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये अग्रेसर असलेल्या ‘फेसबुक’ने ‘स्लिंगशॉट’ हे नवे अ‍ॅप बाजारात आणले आहे. वापरकर्त्यांना छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती अपलोड करण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. फेसबुकने उचललेल्या या पावलामुळे स्नॅपचॅट या सध्या बाजारपेठेत आघाडीवर असलेल्या अ‍ॅपशी ‘स्लिंगशॉट’ची आता थेट स्पर्धा होणार आहे.
स्लिंगशॉट या अ‍ॅपच्या मदतीने वापरकर्ते छायाचित्रे काढू शकतील, तसेच ध्वनिचित्रमुद्रणही शक्य होऊ शकेल. तसेच अशा छायाचित्रांविषयी मजकूर लिहून व छायाचित्रांमध्ये रंग भरून ते आपल्या मित्र-मैत्रिणींना पाठविण्याची -‘स्लिंग करण्याची’ सुविधाही हे अ‍ॅप ग्राहकांना पुरविणार आहे. विशेष म्हणजे असा मजकूर मिळालेली व्यक्ती मजकूर पाठविणाऱ्या व्यक्तीस जोपर्यंत प्रतिसाद पाठवत नाही, तोपर्यंत मूळ मजकूर वाचता किंवा पाहता येणार नाही.
गेल्याच आठवडय़ात ही सेवा सुरू करण्यात आली असून बुधवारपासून अँड्रॉइड स्मार्टफोन (जेली बिन आणि किटकॅट प्रणालीधारक) व आय-फोन (आयओएस ७) धारकांना तिचा लाभ घेता येणार आहे.
गेल्याच वर्षी फेसबुकने स्नॅपचॅट विकत घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. स्नॅपचॅटवर, केवळ काही क्षणांसाठीच दिसणारे संदेश पाठविण्याची सुविधा वापरकर्त्यांला उपलब्ध करून देण्यात आली होती. हे संदेश अवघ्या काही क्षणांमध्ये अदृश्यही होत असत. त्या वेळी फेसबुकतर्फे ३ अब्ज डॉलर मोजून स्नॅपचॅट विकत घेण्याची तयारी दर्शविण्यात आल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.
तरुणांना आकर्षित करणाऱ्या सेवा निर्माण करण्यासाठी तसेच सध्या असलेली १ अब्ज २८ कोटी वापरकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. सन २०१२ मध्ये फेसबुकने इन्स्टाग्रॅम ही छायाचित्रे शेअर करणारी सेवा विकत घेतली होती तर गेल्याच वर्षी १९ अब्ज डॉलरना व्हॉट्सअप विकत घेतले होते.
सृजनशीलतेला चालना मिळावी म्हणून..
मोबाइल फोनचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी केवळ बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा सर्जनशील निर्मिती करावी, अशी आमची इच्छा होती. जेव्हा वापरकर्त्यांचा सहभाग वाढतो तेव्हा ताण आपोआपच कमी होतो. सर्जनशीलतेस चालना मिळते आणि आयुष्यातील लहान-लहान अनुभवही इतरांचे आयुष्य समृद्ध करू शकतात, अशी भावना स्लिंगशॉटच्या ब्लॉगवर व्यक्त करण्यात आली आहे. आम्हीही यापूर्वी स्नॅपचॅट वापरले आहे. तो आनंद आणि काही वेगळे केल्याचे समाधान मिळावे म्हणून आम्ही हा प्रयत्न केला आहे. तरुण वर्ग उत्साहाने याचे स्वागत करेल अशी अपेक्षा ब्लॉगवर व्यक्त केली आहे.