मी मंदिरात गेलो असताना तिथे एक कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी मला जातीभेदाचा सामना करावा लागला. मला अपेक्षा नव्हती की मंदिरात गेलो असताना असं काही घडेल. केरळचे मंदिर व्यवहार मंत्री के. राधाकृष्णन यांनी ही खंत बोलून दाखवली आहे. तसंच हिंदू धर्मातल्या जात व्यवस्थेवर टीका केली आहे.
हिंदू धर्माचा अर्थ एकच आहे तो म्हणजे लोकांमध्ये भेदाभेद निर्माण करणं. केरळचे मंत्री राधाकृष्णन हे CPI (M) चे सदस्य आहेत. तसंच पक्षातला एक दलित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मंदिरात आलेल्या अनुभवानंतर त्यांनी हिंदू धर्मावर टीका केली आहे. असं असलं तरीही नेमक्या कोणत्या मंदिरात त्यांना हा भेदभावाचा अनुभव आला हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. इंडियन एक्स्प्रेसने या बद्दलचं वृत्त दिलं आहे.




राधाकृष्णन यांना नेमका काय अनुभव आला?
राधाकृष्णन यांनी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले मी जेव्हा मंदिरात एका कार्यक्रमासाठी गेलो होतो तेव्हा मला दीप प्रज्वलन करण्यासाठी बोलवण्यात आलं पण त्यावेळी मला दीप प्रज्वलन करण्यासाठी कोणताही दिवा हाती देण्यात आला नाही. तिथल्या पुजाऱ्यांनी दिवे आणले होते. मात्र माझ्या हातात त्यांनी एकही दिवा दिला नाही. पुजाऱ्यांनी दीप प्रज्वलन केलं आणि त्यानंतर त्यांच्या हातात असलेला दिवा जमिनीवर ठेवून दिला. त्यांची अपेक्षा अशी होती की मी जमिनीवर ठेवलेला दिवा उचलावा आणि दीप प्रज्वलन करावं. राधाकृष्णन यांनी रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना आलेला अनुभव सांगतिला.
मी दिलेला निधी चालतो पण मला अस्पृश्य मानतात
पुजाऱ्यांनी मला दीप प्रज्वलन केल्यानंतर जेव्हा दिवा दिला नाही, त्यांनी तो दिवा दुसऱ्या पुजाऱ्यांच्या हाती दिला. मला वाटलं की ही त्या मंदिराची प्रथा आहे. पण दुसऱ्या पुजाऱ्याने जेव्हा दिवा खाली ठेवला तेव्हा त्यांची ही अपेक्षा होती की मी दिवा उचलून दीप प्रज्वलन करावं. माझ्याकडून जेव्हा निधी घेता तेव्हा तो निधी त्यांना अस्पृश्य वाटत नाही.. मात्र मी त्यांना अस्पृश्य ठरलो मला त्यांच्या वागणुकीतून त्यांनी हेच दाखवून दिलं असंही राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे.